छत्रपती संभाजीनगर: दोन्ही शिवसेना एकत्र यायला हवी, असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटते. आजही आम्ही सुखदु:खाची विचारपूस करतो. अशावेळी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा, असे मत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाट यांनी येथे एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, दोन शिवसेना होणं शिवसैनिकांना आवडलं नाही. माझ्याही मनाला यातना होतात. उबाठाचे नेते, पदाधिकारी भेटले की, त्यांच्या आणि आमच्या मनाची अवस्था अशीच असते. तू त्या पक्षात, मी ह्या पक्षात हे दोघांनाही पटत नाही. पण करावं काय? सत्तेमध्ये जाण्याचा धडपडीचा हा परिणाम झाल्याचे मंत्री शिरसाट म्हणाले. जर संधी मिळाली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, मंत्री शिरसाट यांनी सांगितले. पण ते होईल की नाही हा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.
एकत्र येण्याचा प्रयत्न एका बाजूने करून चालत नाही,असे नमूद करीत ते म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. ते तर एका कुटुंबातील व्यक्ती असूनही एकत्र आले नाहीत. आम्हाला एवढं दूर लोटले गेलं आणि आम्ही त्या गावचे नाहीत असे त्यांना वाटत आहे. शिवसेनेची ही ताकद एकत्र यायला हवी. पण याकरीता दोन पावलं दोघांनी मागे जाणे हाच उपाय असू शकतो, असेही पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.
आता जोडायची वेळ आहे...वरिष्ठ फळीतल्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकतं. कारण माझ्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की आम्ही एकत्र आले पाहिजे.. दाेन्ही पक्षात जे अंतर वाढत आहे. ते वेळीच थांबविले नाही तर भविष्यात दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी जातील. यामुळे आता जोडायची वेळ आहे . कारण आता दोन्ही पक्षांत एवढे अंतर नाही की ते एकत्र येऊ शकणार नाही.