वाळूज महानगर : तीसगाव ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीला गालबोट लागले असून, मोहन चौधरी या सदस्याचे विना क्रमांकाच्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. या अपहरण नाट्याच्या गोंधळात विशेष सभेत अंजन साळवे यांची सरपंचपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे.या ग्रामपंचायतीचे सरपंच मिठ्ठूलाल तरय्यावाले यांच्याविरुद्ध २२ आॅगस्टला ९ विरुद्ध २ अशा बहुमताने अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते. या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात सरपंच मिठ्ठूलाल तरय्यावाले यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करून आपल्याविरुद्ध नियमबाह्यरीत्या अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी सरपंच मिठ्ठूलाल तरय्यावाले यांचे अपील फेटाळून अविश्वास प्रस्ताव योग्य असल्याचा निकाल दिल्यामुळे सरपंच मिठ्ठूलाल तरय्यावाले यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले. गेल्या चार महिन्यांपासून सरपंचपद रिक्त असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने आज ३० डिसेंबरला सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपदासाठी अंजन साळवे, मिठ्ठूलाल तरय्यावाले व विजय साळे या तिघा सदस्यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. नामांकन अर्ज दाखल केलेल्या विजय साळे यांनी अंजन साळवे यांना बिनशर्त पाठिंबा दिला. यावेळी मतदान प्रकिया गुप्त पद्धतीने घेण्यात आली. यात अंजन साळवे यांना ८ तर विरोधी गटाचे मिठ्ठूलाल तरय्यावाले यांना ४ मते पडली. मोहन चौधरी हे एक मात्र सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे अध्यासी अधिकारी एच.आर. सोनवणे यांनी अंजन साळवे हे ४ मते अधिक मिळवून विजयी झाल्याचे जाहीर केले. यावेळी सहायक म्हणून तलाठी राजेंद्र बागडे, ग्रामसेवक ए.सी.पटेल यांनी काम पाहिले. या ग्रामपंचायतीचा एक वर्षाचा कार्यकाळ बाकी असून, सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे. नवनिर्वाचित सरपंच अंजन साळवे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. शेख सलीम, काकासाहेब तुपे, साळुंखे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
सरपंचपदाच्या निवडणुकीला गालबोट
By admin | Updated: December 31, 2014 01:04 IST