औरंगाबाद : महावितरणने जबरी वसुली थांबवावी, कोरोना काळातील वीजबिल माफ करावे अथवा हप्ते पाडून द्यावे अशा मागण्या करत भाजपाने शुक्रवारी सकाळी ११ वाजता महावितरणच्या विरोधात गारखेडा येथील सहाय्यक अभियंता कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. वाढीव वीजबिलात सूट देण्याची मागणी लावून धरत आक्रमक आंदोलकांनी सहाय्यक अभियंता कार्यालयास टाळे ठोकले.
कोरोना काळातील १०० युनिटची सूट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती ती दिली जात नाही. वाढीव वीजबिलात कुठलीही सवलत दिली जात नाही यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यांना दिलास द्यावा अशा मागण्या करून भाजपने शुक्रवारी सकाळी महावितरणच्या गारखेडा येथील सहाय्यक अभियंता कार्यालयावर हल्लबोल आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ऊर्जामंत्री नितीन राऊत हाय हाय, आघाडी सरकार मुर्दाबाद, लाईट बिल माफ झालेच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. महावितरणने जबरी वसुली थांबवून त्यांना दिलासा द्यावा. आज केवळ टाळे लावून चेतावणी दिली. लोकांना वीज बिलात सूट दिली नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा आ.अतुल सावे यांनी यावेळी दिला.