लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेली दरी दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य पातळीवर ताणलेल्या या संबंधाचे परिणाम औरंगाबादेतही दिसून येत आहेत. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचा संसार मागील अडीच वर्षांपासून सुरळीत सुरू होता. नोव्हेंबर महिन्यात होणाºया महापौर निवडणुकीत युतीला फारकत देत भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. भाजप वरिष्ठांनीही ‘आपला महापौर होत असेल तर तयारीला लागा’ असे संकेत दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. आकड्यांचे गणित सध्या तरी भाजपच्या विरोधात आहे. बहुमताच्या जादुई आकड्यांपर्यंत जाण्याची शक्यताही कमीच आहे.अडीच वर्षांपूर्वी मनपाच्या निवडणुका झाल्या. सर्वाधिक जागा शिवसेनेने मिळविल्या. दुसºया क्रमांकावर एमआयएमने बाजी मारली. तिसºया क्रमांकावर भाजप होता. सत्तेसाठी शिवसेना-भाजप नेत्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवूनही युती केली. येणाºया पाच वर्षांसाठी कागदावर एक करार करण्यात आला. दरवर्षी कोणती पदे कोणाला मिळतील हे सुद्धा ठरविण्यात आले. पहिले दीड वर्ष महापौरपद सेनेने आपल्याकडे ठेवले. आता १० महिने भाजपला देण्यात आले. सभापतीपदासाठीही करारानुसारच पद वाटप करण्यात आले. ३१ आॅक्टोबर रोजी महापौर बापू घडामोडे यांचा कार्यकाळ संपतो. करारानुसार पुढील अडीच वर्षे महापौरपद सेनेकडे राहणार आहे. यंदा महापौरपद ओबीसीसाठी राखीव आहे. सेनेतील दिग्गज या संधीची वाट पाहून आहेत. निवडणुका जवळ येत असतानाच भाजपने एकला चलो रे अशी भूमिका घेणे सुरु केले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही आपला महापौर होत असेल तर जुळवाजुळव करायला हरकत नाही, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांनी आकड्यांचा खेळ सुरू केला आहे. २३ मतांवर भाजप आपला महापौर कसे काय करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बहुमतासाठी किमान ५८ मतांची गरज आहे.
भाजपकडून महापौर निवडणुकीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:56 IST