बायोमेट्रिक यंत्रणेचा फज्जा
By Admin | Updated: May 29, 2015 00:22 IST2015-05-29T00:22:14+5:302015-05-29T00:22:14+5:30
देऊळगाव राजा येथील शासकीय कार्यालयातील प्रकार ; शासकीय कार्यालयातील मशीन धूळ खात.

बायोमेट्रिक यंत्रणेचा फज्जा
देऊळगावराजा ( जि. बुलडाणा) : राज्यात ई- प्रशासन अधिक सक्षम कसे करता येईल, यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. देऊळगावराजा तालुक्यातील शासकीय कार्यालयांनी मात्र शासनाच्या या धोरणाला बगल दिली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाने प्रशासकीय यंत्रणा हायटेक करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये इंटरनेट सुविधेशी जोडलेली बायोमेट्रिक प्रणाली अमलात आणली; मात्र कर्मचार्यांच्या येण्या-जाण्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे बायोमेट्रिक यंत्रेणेचा फज्जा उडाला आहे. शासकीय कार्यालयामध्ये पेपरलेस कामकाज होण्यासाठी इंटरनेट सेवेवर भर देण्यात येत आहे. कार्यालयातील सर्व कामे ऑनलाईन झाले आहे. यातून नागरिकांना विविध सुविधाही ऑनलाईनच पुरविल्या जाते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा आणि तालुकास्तरावर प्रत्येक शासकीय कार्यलयामध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी वेळेवर कामावर हजर व्हावेत, याची नोंदणी घेण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली शासनाकडून कार्यान्वित करण्यात आली. या यंत्रणेद्वारे कार्यालयात येणार्या अधिकारी व कर्मचार्यांना हजेरी पुस्तिकेवर हजेरी लावण्याऐवजी बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून थंब मशीनवर आपला अंगठा दाबून हजेरी लावावी लागते; परंतु देऊळगावराजा तालुक्यांतील पंचायत समिती, नगर परिषद, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय कोणत्याही प्रकारची बायोमेट्रिक प्रणालीचा अद्यापही कुठलाही वापर सुरू झाला नाही. त्यामुळे कार्यालयात या मशीन केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. पंचायत समितीमधील बायोमेट्रिक यंत्रणा दिसत नाही. नगर परिषदमध्ये लागलेली बायोमेट्रिक यंत्रणेकडे सर्वांचे दुर्लक्ष दिसून येत आहे.