छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील एकूण १,३४१ गावांपैकी जवळपास अर्ध्या म्हणजे ७५६ गावांमध्ये स्मशानभूमी समस्यांच्या विळख्यात आहेत. तर १८८ गावांत स्मशानभूमीच नाहीत. तसेच २३१ गावांत स्मशानभूमीला जाण्यास पक्का रस्ताच नसल्याने चिखलातून, काट्यातून जावे लागते. काही ठिकाणी स्मशानभूमीची नोंद सातबाऱ्यामध्ये नसल्याने काही जणांनी त्यावरही अतिक्रमण केले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी याकडे लक्ष देत स्मशानभूमी समस्या निवारण अभियान हाती घेतले आहे. ग्रामसेवक आणि तलाठ्यांनी गावोगावी जाऊन स्मशानभूमीचा आढावा घेत वादग्रस्त जागा, रस्ते, नोंदींची माहिती संकलित केली.
१५ ते २५ मे दरम्यान राबविलेल्या अभियानातून जिल्ह्यात असलेल्या एकूण १,३४१ गावांपैकी ७५६ ठिकाणी समस्या दिसून आल्या. १७० ठिकाणी सातबाऱ्यात नोंदच आढळली नाही. १८८ गावांत स्मशानभूमी नसल्याने नवीन स्मशानभूमी बांधण्याची मागणी पुढे आली. १७ ठिकाणी स्मशानभूमीच्या जागेवरही अतिक्रमण आढळून आले. २३१ ठिकाणी जाण्यास रस्ता नव्हता. तर ६४६ ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा आढळून आल्या नाहीत. स्मशानभूमी बांधण्याचा आराखडा जुलै अखेर होईल.
प्रशासनाचा पुढाकारस्मशानभूमीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. डीपीसीतूनही निधी मंजूर झाला आहे. पावसाळ्यात प्रत्येक स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यास सांगितले आहे.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी