छत्रपती संभाजीनगर : जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासह कृष्णा खोरे विकास महामंडळाला १ एप्रिल २०२६ पासून स्वायत्त करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. याअनुषंगाने पहिली बैठक १२ डिसेंबर रोजी नागपुरात आयोजित करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्राने दिली. महामंडळे स्वायत्त झाल्यास मंडळाचा सर्व खर्च स्वत:च्या उत्पन्नातूनच भागवावा लागणार आहे. मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यरत आहे.
या महामंडळाचे कार्यालय जालना रोडवरील सिंचन भवन येथे आहे. महामंडळाकडून धरणे बांधणे आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यात येते. महामंडळांच्या आस्थापनेवर दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च होतो. हा खर्च सध्या शासनाच्या अनुदानातून भागविण्यात येतो. धरणांतील पाणी सिंचन आणि पिण्यासाठी देण्यात येते. यातून मिळणारी पाणीपट्टीतून महामंडळाला बऱ्यापैकी निधी मिळतो. आता पाटबंधारेमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १ एप्रिलपासून दोन्ही महामंडळे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांनी जायकवाडी प्रकल्पावर सोलार वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. तसेच सर्व धरणांतील मत्स्य परवानेही मत्स्य व्यवसाय विभागामार्फत न देता महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून देण्यात यावे, यातून महामंडळाला महसूल मिळणार आहे.
लहान, मोठी आणि मध्यम धरणांसाठी संपादित जमिनी महामंडळाच्या नावे करण्यात यावी. विविध शहरांत महामंडळाची कार्यालये आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीवर गाळे उभारून लीजवर देऊन उत्पन्न वाढविता येऊ शकते. याबाबतचे निर्देश यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजीच्या महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत विखे पाटील यांनी कार्यकारी संचालक आणि मुख्य अभियंत्यांना दिले होते. आता पुन्हा १२ डिसेंबरला नागपूर येथे विधिमंडळात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही महामंडळाच्या कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता आणि अन्य अधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.
धरणाजवळ पर्यटन विकास केंद्रमहामंडळ आता पर्यटन धोरण राबविणार आहे. पैठण येथील जायकवाडी प्रकल्पालगत संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांचे आकर्षण आहे. या उद्यानामुळे मंडळाला चांगले उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशाच प्रकारे विविध ठिकाणच्या धरणांजवळ पर्यटन केंद्र विकसित करण्याचा मानस महामंडळाचा आहे.
Web Summary : The Godavari Marathwada Irrigation Corporation will become autonomous by April 2026. This decision aims to make the corporation financially self-sufficient. Plans include solar power generation at Jayakwadi project and revenue from reservoir fisheries. Tourism development near dams is also planned to boost revenue.
Web Summary : गोदावरी मराठवाड़ा सिंचाई निगम अप्रैल 2026 तक स्वायत्त हो जाएगा। इस निर्णय का उद्देश्य निगम को आर्थिक रूप से आत्मनिर्भर बनाना है। योजनाओं में जायकवाड़ी परियोजना पर सौर ऊर्जा उत्पादन और जलाशय मत्स्य पालन से राजस्व शामिल है। राजस्व को बढ़ावा देने के लिए बांधों के पास पर्यटन विकास की भी योजना है।