छत्रपती संभाजीनगर : सोळा वर्षे चाललेल्या मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रखर संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत विद्यापीठ गेटवर मंगळवारी राज्यभरातून भीमसागर उसळला. या ठिकाणी दिवसभर पुस्तके आणि बुद्ध- बाबासाहेबांच्या मूर्तींनाही मोठी मागणी दिसून आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाच आमचा श्वास, असे मानूनही त्यांच्याच नावावर अनेकांनी गटबाजीचे दर्शन घडवत येथे मोठ्या जाहीर सभाही घेतल्या.
विद्यापीठ गेटचा सारा परिसर बॅनर्स, पोस्टर्सनी सजून गेला आहे. जागा मिळेल तिथे कुणाचे ना कुणाचे छोटे-मोठे पोस्टर बघायला मिळत होते. यावर्षी धम्मदानाची मागणी करण्यासाठी विविध ठिकाणी संबंधित मंडळी उभी असलेली दिसली. दिनदशिकांची मागणीही मोठी होती.
विद्यापीठ गेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीम अनुयायी गळ्यात निळे गमछे घालून रांगेत दिसले. ही गर्दी सायंकाळपर्यंत प्रचंड वाढली. सकाळी समता सैनिक दलाने बाबासाहेबांना खडी सलामी दिली. विविध पक्ष, संस्था-संघटनांचेे पदाधिकारी, नेते उत्साहात अभिवादन करीत होते. सकाळीच पँथर रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या सूर्यकांता गाडे यांनी शहीद स्तंभाला अभिवादन केले. आंबेकडरवादी संघर्ष समितीतर्फे श्रावण गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह अभिवादन केले. बहुजन सामाजिक-सांस्कृतिक मंच, बाबा दळवी विचार मंच, प्रबुद्ध युवा प्रबोधन मंच, आदी संस्था-संघटनांतर्फे कांचन सदाशिवे, सूरज जाधव, किशोर गडकर, प्रा. कीर्तिलता पेटकर, आदींनी अभिवादन केले.
दुपारी भीमशक्तीतर्फे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अन्नदानाचा कार्यक्रम झाला व नंतर त्यांची जाहीर सभा झाली. सभेसाठी रिपाइं आठवले गट, आनंदराज आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, दलित कोब्रा यांच्यासह छोट्या-मोठ्या पक्षसंघटना सज्ज दिसल्या. संजय जगताप यांच्या पुढाकाराने यंदाचा भीमगीतांचा कार्यक्रम रंगला. बाबासाहेबांच्या पुतळ्यालगतच पँथर्स रिपब्लिकन पार्टीची सभा झाली. सभेपूर्वी ‘भीमराज की बेटी’ फेम पंचशीला भालेराव यांच्या संगीत चमूने एकापेक्षा एक भीमगीते सादर करून धमाल उडवली! अभिवादनासाठी रात्री उशिराही गेटवर गर्दी चालूच होती.