छत्रपती संभाजीनगर : भीमजयंतीचा अमाप उत्साह मिरवणुकीत पाहायला मिळाला. रस्त्याच्या आजूबाजूला थाटण्यात आलेल्या स्टेजचीच जणू स्पर्धा बघावयास मिळाली. स्टेज समोर तरुणाई थिरकत होती. क्रांती चौक, सिल्लेखाना आणि पैठणगेटवर कर्ण कर्कश डीजेने उच्चांक गाठला होता.
क्रांती चौक ते सिटी चौकापर्यंत आबालवृद्ध भीम अनुयायांची गर्दी लक्षणीय ठरली. त्यातही नटून थटून आलेल्या महिला भगिनींचा सहभाग मोठा होता. सिल्लेखाना चौकात स्टेजवर अरुण बोर्डेे यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे भव्य पुतळे उभारले होते. ते लक्ष वेधून घेत होते. डीजेवर थिरकणारी तरुणाई येथे अधिक होती. आमदार विलास भुमरे मित्र मंडळाच्या स्टेजसमोर तरुणाई थिरकत होती. तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघातर्फे बाबासाहेबांचा जीवनपट दाखवला जात होता. या महासंघाचे अध्यक्ष ९२ वर्षीय प्र. ज. निकम गुरुजी, संस्थापक अध्यक्ष रतनकुमार पंडागळे, माणिकराव ठाकरे हे सर्वांचे भीमा कोरेगावचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करीत होते. अनिकेत निल्लावार यांच्यातर्फे वीस हजार पाणी बॉटल वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी अजित पवार, अभिजित जाधव मित्र मंडळ, संदीप शिरसाठ मित्र मंडळ, आझाद समाज पार्टी, भीम आर्मी, बाळू भाऊ शिंगाडे, पोलिस बॉइज असोसिएशन, रिपाइं आठवले, भारतीय जनसंघर्ष सेना, सकल चर्मकार बांधव, लोकजनशक्ती पार्टी, राहुल मकासरे, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, जयप्रकाश नारनवरे, आमदार संजय केणेकर मित्र मंडळ, बोधिसत्त्व प्रतिष्ठानचे विजय साळवे, मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे रमेश गायकवाड, सरकार प्रतिष्ठानचे दीपक निकाळजे, भारतीय दलित पँथरचे रमेशभाई खंडागळे, भीमशक्ती, आंबेडकरवादी संघर्ष समिती, टी. एम. कांबळे रिपाइं (डी), वंचित बहुजन आघाडीचे पंकज बनसोडे, बसपा, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन, भाकप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महासमितीचे अध्यक्ष विजय मगरे, काँग्रेसचे पवन डोंगरे, सकल ओबीसी समाज, रोटी बँक, दलित पँथरचे संजय जगताप, वंबआ अमित भूईगळ, भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन सेना यांचे स्टेज मिरवणुकीत बघावयास मिळाले.
मिरवणुकीत सजीव-निर्जीव देखावेमिरवणुकीत विविध भागांतील मंडळ, समिती यांच्या वतीने सजीव-निर्जीव देखावे सादर केले. सा.बां. विभागातर्फे चारचाकी वाहनात बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. डाॅ. जितेंद्र देहाडे युवा मंचच्या पथकातील ४० मुलांनी लेझीमचे सादरीकरण केले. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावाही साकारण्यात आला होता. बौद्धनगर, जवाहर काॅलनी युवक उत्सव समितीतर्फे डाॅ. बाबासाहेब व रमाई यांच्या विवाहाचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. या समितीने साकारलेल्या ‘मानाचा पहिला रथ’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मिरवणूक मार्गात ४२ स्वागत स्टेजक्रांती चौक ते भडकल गेटदरम्यान विविध पक्ष, संघटना यांच्या वतीने ४२ हून अधिक स्वागत स्टेज उभारण्यात आले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध मंडळ, पथकांच्या पदाधिकाऱ्यांचे या स्टेजवर स्वागत करण्यात येत होते.
मिरवणुकीत यंदा ‘एआय’ची जादूमिरवणुकीत यंदा ‘एआय’ अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जादू दिसली. विविध स्वागत स्टेजवर एलईडीवर ‘एआय’च्या माध्यमातून तयार करण्यात आलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील व्हिडिओ आणि छायाचित्रे दाखविण्यात आली. यासह इतर महापुरुषांचीही छायाचित्रेही दाखविली.
रंगबेरंगी ‘लेझर शो’, सोबत ‘डीजे’वर भीमगीतांचे सादरीकरणस्वागत स्टेजवर भव्य अशा एलईडी स्क्रीन आणि रंगीबेरंगी ‘लेसर शो’मुळे मिरवणूक मार्ग उजळून निघाला होता सोबत एकापेक्षा एक सरस अशा भीमगीतांचे सादरीकरण करण्यात येत होते.
तरुणाईने धरला ठेकामिरवणुकीत डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही जल्लोष पाहायला मिळाला. कुटुंबीयांसह अनेक जण आले होते.
देखाव्यातून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची झलकविविध भागांतील संघटनांनी देखावे, बॅनरच्या माध्यमातून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे सादरीकरण केले.
पैठण गेटवर ३० फूट उंच प्रतिकृतीपैठण गेट येथे नागसेन मित्रमंडळातर्फे बुद्धगया येथील महाबोधी महाविहारची ३० फूट उंचीची भव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आली होती. या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
घोडागाडीतून राजगृहाकडे जाताना...डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे रमाई यांना पहिल्यांदा राजगृहाकडे घोडागाडीतून घेऊन जातानाचा क्षण देखाव्यातून संदीप शिरसाट मित्रमंडळाने भव्य स्टेजवर सादर केला.
आंबेडकर- फुले- राजर्षी शाहूंचे भव्य पुतळेसिल्लेखाना चौकात विठ्ठलराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे भव्य व्यासपीठावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांचे भव्य पूर्णाकृती पुतळे ठेवण्यात आले. सोबतच एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती.
शाक्यपुत्र झांज पथकाची धूम...मिरवणुकीत मिलिंद बनसोडे संचलित शाक्यपुत्र वाद्य व झांज पथकाने एकापेक्षा एक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बाबासाहेबांच्या जीवन प्रसंगांवर ही प्रात्यक्षिके साकारली होती. बाळासाहेबांचा भव्य पुतळा लक्ष वेधून घेत होता. तालासुरातील सादरीकरण हे वैशिष्ट्य ठरले.
- आग ओकणारा सूर्य शांत होताच सायंकाळी मिरवणूक मार्गात नागरिकांची गर्दी सुरू.- शहरातील विविध भागांसह ग्रामीण भागांतील भीमसैनिक मिरवणूक पाहण्यासाठी आले.- मालेगाव, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली येथील डीजेंचा मिरवणुकीत सहभाग.- मिरवणुकीचा मार्ग विविध रंगांच्या ‘लेझर लाईट’ने न्हाऊन निघाला.- रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण मिरवणूक मार्ग गर्दीने फुलून गेला. पाय ठेवायलाही जागा नव्हती.- अनेकांच्या शर्टवर ‘जय भीम’ लिहिलेले, डोक्यावर निळी टोपी, हातात झेंडा आणि ओठांवर घोषणा.- पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करून तरुण-तरुणी, महिला-पुरुष मिरवणुकीत सहभागी.- विविध संस्था, संघटनांतर्फे पाणी, अन्न वाटप.