लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बैठक खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत बेडरूममधील कपाट उघडून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना बीड शहरातील स्वराज्य नगर मध्ये बुधवारी भर दिवसा घडली. या चोरीत सुमारे १० ते १५ लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.बीड शहरातील स्वराज्य नगर भागात ठेकेदार संतोष ढाकणे यांचे घर आहे. त्यांची पत्नी अनिता ढाकणे या जिल्हा रुग्णालयात परिचारिका आहेत. बुधवारी दुपारी १२ वाजता अनिता ढाकणे या जिल्हा रुग्णालयात गेल्या. यावेळी त्यांची दोन मुलेच घरी होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची मुले घराला कुलूप लावून शाळेत गेली. चार वाजण्याच्या सुमारास अनिता ढाकणे या घरी आल्या असता त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आपल्या मुलांना आवाज दिला. परंतु घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. घरात प्रवेश करताच त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यांनी बेडरूमध्ये पाहिले असता कपाटही उघडे दिसले. तपासणी केली असता रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर त्यांनी आरडाओरडा करून शेजाºयांना बोलावून घेतले. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भुषण सोनार यांच्या पथकाने घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली. त्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, दरोडा प्रतिबंधकचे श्रीकांत उबाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सचिन पुंडगे यांनी भेट देऊन वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी करून चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत याची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून चौकशी करताना दिसून आले.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणभर दुपारी गजबजलेल्या ठिकाणी लाखो रूपयांची घरफोडी झाल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. हे तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.पोलीस येण्यापूर्वीच वस्तू हाताळल्याचोरीची माहिती मिळाल्यावर शेजाºयांनी ढाकणे यांच्या घरी धाव घेतली. कोठे काय आणि कशी चोरी झाली हे प्रत्येकजण हात लाऊन पहात होते. यामुळे पोलिसांना घटनास्थळावरचे ठसे घेण्यात अडचणी आल्या. नागरिकांनी कोणत्याही वस्तूला हात लावला नसता तर ठसे घेऊन आरोपी शोधण्यास पोलिसांना मदत झाली असती, अशी चर्चा होती.एका महिलेने चोर पाहिलाढाकणे यांच्या घरातून चोरी करून बाहेर निघाल्यावर शेजारील एका महिलेने व तिच्या मुलाने चोराला पाहिल्याची प्राथमिक माहिती आहे.या महिलेला गुन्हेगारांचे छायाचित्र दाखविण्यात आले. परंतु उशिरापर्यंत एकालाही तिने ओळखले नव्हते.परंतु या महिलेने दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवला असून तो पोलिसांना दिला आहे. यामुळे तपासात मदत होणार आहे.अन शेजारी बदलले...पोलीस येण्यापूर्वी परिसरातील महिलांनी आपण दोघांना दुचाकीवरून जाताना पाहिल्याचे सांगितले होते.महिलांनी एकमेकिंशी बोलताना त्यांचे वर्णनही सांगितले होते. परंतु पोलीस येताच कोणीच पुढे आले नाही. आपण पाहिले नाही, पाहिले नाही, असे म्हणून सर्वांनीच माघार घेतल्याची चर्चा घटनास्थळी होती.केवळ एक महिला पोलिसांना तपासात मदत करताना दिसून आली.
बीडमध्ये भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 21:50 IST