औरंगाबाद : कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूवर चाकूने वार करणाऱ्या पतीची फाशीची शिक्षा रद्द करून त्यास जन्मठेप सुनावण्यात आली. तर खटल्याच्या सुनावणी दरम्यान फितूर झालेल्या चार साक्षीदारांवर शपथेवर खोटे बोलले म्हणून सत्र न्यायालयाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
यावल पिंपरीतांडा (ता. घनसावंगी. जि. जालना) येथील कृष्णा सीताराम पवार याने पत्नी नांदायला येत नाही, या रागातून २४ ऑक्टोबर २०१५ रोजी भरदुपारी २ वाजता अंबड येथील आंबेडकर चौकात पत्नी ललिता, सासू सुमनबाई आणि मावससासू अलकाबाई यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात सासु सुमनबाई आणि पत्नीच्या पोटातील अर्भक मरण पावले होते. तर पत्नी आणि मावससासू गंभीर जखमी झाले होते. जालना सत्र न्यायालयाने कृष्णाला सासूच्या खुनाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली होती. तसेच पत्नी आणि मावससासू यांच्या खुनाचा प्रयत्न केला म्हणून जन्मठेप आणि अर्भकाच्या खुनाच्या आरोपाखाली ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला होता. ही शिक्षा खंडपीठाने कायम केली.
आरोपीची फाशीची शिक्षा कायम (कन्फर्म) होण्यासाठी शासनाने आणि या शिक्षेविरुद्ध आरोपी कृष्णने खंडपीठात अपील दाखल केले होते. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील किशोर होके पाटील तर आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी युक्तिवाद केला. हे निकालपत्र राज्यातील सर्व प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना पाठविण्याचे निर्देश खंडपीठाच्या निबंधकांना दिले. तपास अधिकाऱ्याने असंवेदनशीलपणे ढिसाळ तपास केल्याबद्दल खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.