औरंगाबाद : पहाडसिंगपुरा-बेगमपुरा वॉर्ड क्र. १२ मध्ये महापालिकेची पोटनिवडणूक घेण्यात येत असून, मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजप युतीतर्फे खा. चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. खैरे यांच्या उमेदवारीमुळे मागील काही दिवसांपासून युतीकडे तिकीट मागणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रचंड गोची झाली. या वॉर्डात काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे आपली चूल मांडली आहे. मतविभाजनाचा फायदा घेण्यासाठी युती सज्ज झाली आहे. या वॉर्डातून एकूण १४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.सचिन खैरे यांनी मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत २०१५ मध्ये गुलमंडी वॉर्डातून आपले नशीब आजमावले होते. अपक्ष उमेदवार राजू तनवाणी यांनी त्यांचा पराभव केला होता. बेगमपुरा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या वॉर्डातून पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचा निर्णय सचिन खैरे यांनी घेतला. त्यासाठी खा. चंद्रकांत खैरे यांनी सर्व राजकीय समीकरणे जुळवून आणली आहेत. भाजप या वॉर्डात सशक्त उमेदवार देण्याचा प्रयत्न करीत होती. खा. खैरे यांनी फक्त बेगमपुऱ्यासाठी राज्यस्तरावरून युती घडवून आणली. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांचा नाईलाज झाला. पुढील वर्षी महापौरपद भाजपला देण्यात येणार आहे. बेगमपुऱ्यात भाजपने कुरघोडी केली असती तर महापौरपद संकटात सापडले असते. भविष्याचा विचार करून भाजपनेही नमती भूमिका घेतली.मंगळवारी दुपारी सचिन खैरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आ. प्रदीप जैस्वाल, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर कला ओझा, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, नंदकुमार घोडेले, ऋषी खैरे, राजू वैद्य, बाळू थोरात, ज्ञानेश्वर जाधव, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या घोषणाही देण्यात आल्या.
बेगमपुऱ्यात युतीतर्फे सचिन खैरे यांची उमेदवारी दाखल
By admin | Updated: August 10, 2016 00:28 IST