छत्रपती संभाजीनगर : प्रेमविवाहानंतर सासरच्यांनी बळजबरीने घरी नेलेल्या पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरकडच्यांनी मारहाण केली. त्या संतापातून जावयाने स्वत:च पेटवून घेत पोलिसांना सासरच्यांनी पेटवून दिल्याचा जबाब दिला. पाेलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मात्र तथ्य समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सासरा संजय गायकवाड, चुलत सासरा किशोर गायकवाड, सासू सुनीता गायकवाड (सर्व रा. खंडेवाडी, पाटोदा शिवार) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा जावई पवन समाधान अडसूळ (२५, रा. बार्शी, जि. सोलापूर) हा या घटनेत गंभीर जखमी झाला. पवनचा २८ डिसेंबर २०२४ रोजी वडगाव येथील सिद्धेश्वर देवस्थानात प्रियांका संजय गायकवाड हिच्यासोबत प्रेमविवाह झाला. त्यानंतर ते दोघेही आनंदाने राहत होते. प्रियांकाच्या कुटुंबाचा मात्र त्यांच्या विवाहास विरोध होता. १२ मार्च रोजी पवन व त्याचे कुटुंब बाहेर गेलेले असताना गायकवाड कुटुंबाने त्याच्या घरात घुसून प्रियांकाला बळजबरीने घरी नेले. ही बाब कळाल्यानंतर पवनच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी तिच्या बेपत्ता झाल्याची नोंद केली.
स्वतःच घेतले पेटवूनदरम्यान, प्रियांका सतत पवनला घरी घेऊन जाण्यासाठी मेसेज पाठवत होती. २१ एप्रिल रोजी पवन चार मित्रांना घेऊन पत्नीच्या घरी दाखल झाला. तेथे त्याचे पुन्हा सासरच्यांसोबत वाद झाले. त्याला मारहाण देखील झाली. त्या संतापातून त्याने पेटवून घेतले. या घटनेत तो ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना त्याने सासरच्यांनी जाळल्याचे सांगितले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याने स्वत:च पेटवून घेतल्याचे निष्पन्न झाल्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले.