छत्रपती संभाजीनगर : महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या थकीत वीजबिलांची वसुली मोहीम राबवत आहेत. यात थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या शासकीय कामात छत्रपती संभाजीनगर परिमंडळात काही थकबाकीदार ग्राहकांकडून झालेल्या शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण प्रकरणांची व्यवस्थापनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तत्काळ कारवाईसाठी उच्च स्तरावरून तसेच विधि विभागाकडून विशेष पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या आठवडाभरात छत्रपती संभाजीनगर परिमंडळात कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की केल्याच्या ४ प्रकरणांत आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच, आरोपींच्या अटकेचीही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार आरोपींना २ ते १० वर्षांपर्यंतच्या
तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.महावितरणचे अभियंते, कर्मचारी सध्या गंभीर आर्थिक संकटामुळे थकबाकीदारांकडून वीजबिलांची वसुली व नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत आहेत. मात्र वर्षानुवर्षे वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण तसेच कार्यालयांमध्ये जाऊन तोडफोड करण्याचे प्रकार सुरू आहेत. शासकीय कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा कार्यालयांची तोडफोड करणे इ. प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अभियंता व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावता यावे, यासाठी आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेण्याची सूचनामहावितरण सरकारी कंपनी असल्याने वीजबिल नियमित भरले जात नसल्याने थकबाकी वाढत आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांचे सहकार्य व संरक्षण घेण्याची सूचना महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना केली आहे.