छत्रपती संभाजीनगर : देशभरात होणाऱ्या सायबर गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारासाठी शहरातील तरुणांच्या बँक खात्यांचा वापर होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. लक्ष भरतलाल तलरेजा (२२, रा. कृष्णा रेसिडेन्सी, मित्रनगर) हा किशन मिमरोटच्या माध्यमातून शहरातील तरुण, विद्यार्थ्यांना पैसे देऊन त्यांचे बँक खाते वापरत होता. सायबर पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
निखिल साळवे या तरुणाचे जानेवारीत खाते गोठवले गेले होते. त्याने सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्याकडे तक्रार केली. तपासात निखिलच्या खात्यातून १२ लाख ५० हजार रुपयांचे सायबर गुन्ह्यांतील व्यवहार झाल्याने गोठवले गेल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत निखिलने त्याचे बँक खाते मिमरोटला वापरण्यास दिल्याचे सांगितले. पोलिसांनी मिमरोटला ताब्यात घेतले. मिमरोटने तो सर्व खाते लक्षला पुरवत असल्याची कबुली दिली. त्यानंतर लक्षचा शोध सुरू झाला.
कसे चालते 'रेंटेट बँक अकाऊंटचे स्कॅम' ?-लक्ष हा देशातील मुख्य सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांना सायबर फसवणुकीतील पैसे वळते करण्यासाठी बँक खाते पुरवतो. यासाठी त्याला २५ ते ३० टक्के टक्केवारी मिळायची.-लक्षने मिमरोटच्या माध्यमातून शहरातील विद्यार्थी, कामगारांना बँक खात्यांची किट (एटीएम कार्ड, पासबुक, धनादेश) ताब्यात घेतले. यासाठी संबंधितांना महिन्याला ५ ते १० हजार रुपये द्यायचे.-या बँक खात्यांसाठी नवे सीमकार्डही त्यांच्याच नावावर घेऊन तो क्रमांक बँक खात्याला जोडायचे. ते सीम लक्षच्या ताब्यात असायचे. खात्याची माहिती तो सायबर गुन्हेगारांना पुरवायचा. त्यावर नागरिकांच्या फसवणुकीतील रक्कम वळती व्हायची, जी लक्ष रोख स्वरुपात काढून पुढे पुन्हा टोळीला पाठवायचा.
आठ महिन्यांत १.३६ कोटी काढलेएप्रिल, २०२५ पासून लक्ष, मिमरोटने ८ तरुणांचे बँक खाते घेतले होते. या खात्यातून लक्षने एप्रिल ते नोव्हेंबर, २०२५ दरम्यान १ कोटी ३६ लाखांची रोख काढली. त्यापेक्षा अधिक रक्कम या खात्यांवर गोठवली गेली. या खात्यांत देशभरातील ६१ फसलेल्या नागरिकांचे पैसे आले.
कसा अडकला लक्ष ?निखिलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दीड महिन्यांत आठ तरुणांची चौकशी केली. त्यांच्या खात्यातून कोणी पैसे काढले, त्या प्रत्येक एटीएमचे फुटेज हस्तगत केले. त्यात लक्ष स्पष्ट दिसला. त्याला अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक कदीर देशमुख, उपनिरीक्षक गणेश गिरी, अंमलदार योगेश तळवंदे, नितीन देशमुख, सुशांत शेळके, गोकुळ कुत्तरवाडे, धनंजय सानप, अमोल सोनटक्के, संदीप पाटील, राम काकडे, अल्ताफ पठाण, विजय काळवणे, सोनाली भदाने, क्षितिजा कीर्तने यांनी हा तपास केला.
मूळ पाकिस्तानी पार्श्वभूमी, एटीएसकडूनही चौकशी-बारावीपर्यंत शिकलेल्या लक्षचे कुटुंब मूळ पाकिस्तानचे असून, फार पूर्वी ते शहरात स्थायिक झाले. त्यांचे रंगांचे दुकान आहे. दोन वर्षांपूर्वी पोक्सोच्या गुन्ह्यात तो सात महिने कारागृहात होता. तो अनेकदा दुबईला गेला आहे. तेथील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात तो असल्याचा संशय आहे. वर्षभरापूर्वी लक्षची एटीएसने कसून चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.
बँक खाते कोणाला देऊ नकापैशांच्या आमिषापोटी स्वत:चे बँक खाते, मोबाइल सीमकार्ड कोणालाही वापरण्यास देऊ नये. त्याचा सायबर गुन्हे किंवा देशविरोधी कृत्यांसाठी वापर होऊ शकतो.-सोमनाथ जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस
Web Summary : A cybercrime ring using Chhatrapati Sambhajinagar bank accounts was busted. The leader, Laksh Talreja, was arrested for providing accounts to cybercriminals, earning commissions. He obtained bank details from locals by paying them, facilitating illicit transactions. ATS had questioned him before.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में साइबर अपराध गिरोह का भंडाफोड़ हुआ, जिसमें बैंक खातों का इस्तेमाल किया जा रहा था। सरगना, लक्ष तलरेजा को साइबर अपराधियों को खाते प्रदान करने और कमीशन कमाने के आरोप में गिरफ्तार किया गया। उसने स्थानीय लोगों को भुगतान करके बैंक विवरण प्राप्त किए, जिससे अवैध लेनदेन हुआ। एटीएस ने पहले उससे पूछताछ की थी।