शेतकऱ्यांविनाच ‘बळीराजा’ अभियान

By Admin | Published: March 27, 2017 11:50 PM2017-03-27T23:50:42+5:302017-03-27T23:52:25+5:30

तेर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासह त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे

'Baliaraja' campaign without farmers | शेतकऱ्यांविनाच ‘बळीराजा’ अभियान

शेतकऱ्यांविनाच ‘बळीराजा’ अभियान

googlenewsNext

तेर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासह त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या उद्देशाला महसूल विभागातीलच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे उघडकीस आला़ उद्घाटनावेळी २५ ते ३० जणांची उपस्थिती होती. त्यानंतर अवघ्या काही वेळात हे सभागृह रिकामे झाले. त्यामुळे दोन, तीन शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासनाचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरु होता. प्रबोधनापेक्षा निधी खर्च करणे एवढेच आयोजकांचे ध्येय असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होत होत्या.
मागील चार वर्षापासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ डोक्यावरील कर्जामुळे शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या़ शेतकरी आत्महत्येत उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले़ ही गंभीर परिस्थिती पाहता शासनाने शेतकरी आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यास सुरूवात केली़ या अभियानांतर्गतच उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील रूक्मिणी मंगल कार्यालयात २७ मार्च रोजी सायंकाळी शेतकऱ्यांसाठी लघुचित्रपटव कला पथकाद्वारे नाटीकेचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमासासाठी वरिष्ठ अधिकारी येणार असल्याने गावातील राजकीय पुढारी, कार्यकर्ते तसेच कर्मचारी असे जवळपास ३० ते ३२ जण उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते़ उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, प्रभारी तहसीलदार आयुष प्रसाद, नायब तहसीलदार राजेश जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर काही वेळातच अधिकाऱ्यांचा लवाजमा तेथून निघून गेला. काही अधिकारी, कर्मचारी मंगल कार्यालयाच्या बाहेर थांबले़ परंतू अधिकारी जाताच गावातील पुढारी, कार्यकर्त्यांनीही मंगल कार्यालयातून काढता पाय घेतला़ त्यानंतर कार्यक्रम पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी केवळ दोन ते तीन व्यक्ती राहिले़ त्यामुळे या कलापथकाने उपस्थित दोघा-तिघांचेच प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून केले. त्यानंतर त्यातीलही दोघे मध्येच उठून गेले आणि शेवटपर्यंत एकच माणूस कार्यक्रमस्थळी होता. ज्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची आहे, ज्यांंना आत्महत्येपासून परावृत्त करायचे आहे त्या शेतकऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती रहावी यासाठी कसलेही प्रयत्न झाले नाहीत. शेतकऱ्यांपर्यंत कार्यक्रमाची माहिती योग्य पध्दतीने न पोहोचविल्याने तसेच कार्यक्रमाबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याने या उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

Web Title: 'Baliaraja' campaign without farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.