छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री हमी योजनेचे कर्ज नाकारलेल्या अर्जदारांच्या फाइल तुमच्या नावावर फिरवून कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत शहरातील गृहिणी, शासकीय नोकरदार महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. प्राथमिक तपासात १५ महिला तक्रारदार समोर आल्यानंतर ३४ लाखांच्या फसवणुकीचा सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रियंका रवींद्र निकम (रा. सारा परिवर्तन, सावंगी), रवींद्र रतन निकम, विद्या दौलत गायकवाड, राणी दीपक सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत. संगीता दयाराम कांबळे (रा. होनाजी नगर) यांनी तक्रार दाखल केली. जानेवारी २०२४ मध्ये सावंगीतील एका मैत्रिणीच्या ब्यूटिपार्लरवर प्रियंकासोबत ओळख झाली होती. तेव्हा प्रियंकाने रवींद्र, विद्या, राणी मिळून योजनेमार्फत कर्ज मंजूर करून देत असल्याचे सांगितले. या कर्जाची परतफेड करण्याची देखील आवश्यकता नसल्याचे तिने सांगितले. गरिबांना अशा २५ ते ३० कोटी रुपयांच्या फाइल मंजूर करून दिल्याचे आमिष दाखवत मंजूर फाइल दाखवून त्यांचा विश्वास जिंकला. कुटुंबासोबत चर्चा केल्यानंतर संगीता, त्यांची मैत्रीण भारती देवरे यांनी प्रियंकाला पैसे देऊन योजना मंजूर करण्यासाठी तयार झाल्या.
नातेवाइकाला पीए सांगितले, एसबीआयचे बनावट पत्र-संगीता, भारती यांना प्रियंकाने घरी बोलावले. तेथे नातेवाईक असलेल्या राणी, विद्याची पीए म्हणून ओळख करून दिली. संगीता यांनी तिला २५ लाखांची कर्जाच्या फाइलसाठी मागणी केली. त्यासाठी २५ हजार रुपये रोख घेतले.-आणखी कर्ज मंजूर करण्याच्या अपेक्षेने संगीता यांनी आरोपींना १३ लाख ५५ हजार रु. दिले. महिलांचा विश्वास बसावा, यासाठी आरोपींनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात शपथपत्र लिहून दिले. एसबीआय बँकेचे शिक्का असलेले पत्र दिले.
कर्जाच्या रकमेनुसार दरप्रियंकाने मंत्रालय, बँकेत ओळखी असल्याचे सांगून ५ लाखांच्या फाइलला १० हजार, २५ लाखांसाठी २०, ५० लाखांसाठी ४८ हजार रुपयांचा दर असल्याचे सांगितले होते. अशा मंजूर केलेल्या अनेक बनावट फाइल त्यांनी महिलांना दाखवल्या.
तक्रारींसह फसवणुकीचा आकडाही वाढणारसद्य:स्थितीत सर्वाधिक रक्कम संगीता यांची १३ लाख ५५ हजार, भारती देवरे यांचे ८ लाख ८६ हजार, अनिता देवळे यांची १ लाख ७९ हजार, संदीप जगदाळे यांचे २ लाख रुपये असून, एकूण ३४ लाख ५ हजार रुपयांची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदारांसह रक्कम वाढण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.