औरंगाबादचे उद्योजक ‘आंतरराष्ट्रीय एअर कार्गो’सेवेच्या प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:18 PM2018-06-16T15:18:56+5:302018-06-16T15:19:56+5:30

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू होण्याची उद्योगांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

Aurangabad entrepreneur waiting for 'international air cargo' service | औरंगाबादचे उद्योजक ‘आंतरराष्ट्रीय एअर कार्गो’सेवेच्या प्रतीक्षेत 

औरंगाबादचे उद्योजक ‘आंतरराष्ट्रीय एअर कार्गो’सेवेच्या प्रतीक्षेत 

googlenewsNext
ठळक मुद्दे या सेवे अभावी सध्या औद्योगिक मालाची मुंबईमार्गे परदेशात निर्यात करावी लागते.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू होण्याची उद्योगांना प्रतीक्षा करावी लागत आहे. या सेवे अभावी सध्या औद्योगिक मालाची मुंबईमार्गे परदेशात निर्यात करावी लागते. त्यामध्ये वेळ आणि पैसा वाया जात असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाने १२ जून रोजी दिल्लीत नागरी उड्डयन मंत्रालयाचे खाजगी सचिव अंकुर गर्ग, एएआय कार्गो लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड अलायड सर्व्हिसेस कंपनीचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर बी. के. मेहरोत्रा, नागरी उड्डयन मंत्रालयाचे अवर सचिव दीपक साजवान, आर्थिक सल्लागार वंदना अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी चिकलठाणा विमानतळावरील सेवांसंदर्भात चर्चा झाली. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, उद्योजक राम भोगले, उल्हास गवळी, मुनीष शर्मा, आशिष गर्दे यांची यावेळी उपस्थिती होती. 

आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा हाताळण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक होईल. तसेच आवश्यक यंत्रसामग्री चिकलठाणा विमानतळावर कार्यान्वित केली जातील. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक व्यवस्था तयार केली असल्याचे या बैठकीत अंकुर गर्ग यांनी सांगितल्याची माहिती सीएमआयएच्या वतीने देण्यात आली. 

चिकलठाणा विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. या सेवेला प्रतिसाद मिळत असून, दररोज या ठिकाणाहून औद्योगिक मालाची वाहतूक होत आहे. ही सेवा सुरू करताना पुढील तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलमधील संगणकीय यंत्रणेसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात या सेवेची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. 

आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मंजुरी
सार्क  देशांसाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे कार्यान्वित करण्यासाठी औरंगाबाद विमानतळास मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित विमान कंपन्यांकडून औरंगाबाद येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे संचालित केली जाऊ शकतात. ‘फ्लाई दुबई’ने विमानसेवेसाठी रुची दाखवली आहे. याबरोबरच देशांतर्गंत विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने जुलैमध्ये बैठक होईल, असे गर्ग यांनी स्पष्ट केल्याची माहिती ‘सीएमआयए’तर्फे देण्यात आली.

Web Title: Aurangabad entrepreneur waiting for 'international air cargo' service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.