औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेत मनपाचे अधिकारी ‘एमआयएम’च्या वॉर्डांमध्येच कामे करीत आहेत, असा खळबळजनक आरोप मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना नगरसेवकांनी केला. मागील १४ महिन्यांपासून आम्ही ओरड करीत असतानाही सेना-भाजपच्या वॉर्डांमध्ये एक इंचही काम सुरू करण्यात आलेले नाही. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांच्याकडून भूमिगत गटार योजनेचे काम काढून घ्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सेना नगरसेवकांच्या आरोपांना एमआयएमच्या तीन नगरसेवकांनीही कडाडून विरोध दर्शवला.स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका मनीषा मुंढे यांनी जयभवानीनगर येथे ड्रेनेज लाईनची मागणी केली. मागील एक वर्षापासून आपण या कामासाठी पाठपुरावा करीत असून, अधिकारी अजिबात दाद देण्यास तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. मनपात तोंड पाहून कामे होतात असा टोलाही त्यांनी लावला. कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांनी खुलासा केला की, जयभवानीनगर येथे अतिक्रमणे असल्याने एक इंचही जागा शिल्लक नाही. ३० सप्टेंबरनंतर अतिक्रमणे काढून ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. सेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले यांनी मागील १४ महिन्यांपासून आपण पडेगाव-मिटमिटा भागात ड्रेनेज लाईन टाका अशी मागणी करतोय. आजपर्यंत हे काम सुरू झाले नाही. तुम्ही फक्त ‘एमआयएम’ नगरसेवकांच्याच वॉर्डांमध्ये कामे करता, असा आरोप करून सभागृहात एकच खळबळ उडवून दिली. या प्रश्नावरही सिद्दीकी यांनी उत्तर देत नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, आठ दिवसांत काम सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. बऱ्याच वेळानंतर एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांच्या लक्षात आले की, आमले यांनी आपल्या पक्षावर आरोप केले. एडके यांनी तुम्ही एमआयएमचे नाव कशासाठी घेतले, म्हणत आमले यांना जाब विचारणे सुरू केले. एडके यांच्यासोबत नगरसेविका शेख समीना, संगीता सुभाष वाघुले यांनीही तोलामोलाची साथ दिली. आमले यांच्या मदतीला मकरंद कुलकर्णी धावून आले. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी बराच वेळ सुरू होत्या. सभापती मोहन मेघावाले यांनी नमूद केले की, भूमिगत योजनेत प्रशासनाचे चुकत आहे. पक्षांमध्ये भांडणे लावण्याचे काम अधिकाऱ्यांकडून होत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. कोणत्या वॉर्डांमध्ये आतापर्यंत किती काम झाले यावर सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावा असे आदेश त्यांनी दिले. सभापतींच्या आदेशानंतरही एमएमआय नगरसेवकांचे सेनेसोबत पंगा घेणे सुरूच होते.
सेना-एमआयएम नगरसेवकांमध्ये जुंपली!
By admin | Updated: September 28, 2016 00:41 IST