औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. " दानवाचा वध करण्यासाठी अर्जुनाने धनुष्यबाण रोखला " असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यातील लोकसभा आणि विधासनसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आणि पक्ष परिस्थितीचा ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत आढावा घेतला. यावेळी मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातुर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाचा आढावा ठाकरे यांनी घेतला. यात जालना लोकसभा मतदार संघाचा आढवा घेतल्यानंतर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. यावर त्यांनी, "दानवाच्या वधासाठी अर्जुनाने धनुष्यबाण रोखलाय " अशी अत्यंत तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शिवसेनेकडून अर्जुन खोतकर निवडणूक लढण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना पक्षाच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत ‘एकला चले रो’ची घोषणा केली होती. यावर शिवसेनेचा निर्धार कायम असल्याचे चित्र आजच्या आढावा बैठकीतून दिसून आले.