औरंगाबाद : प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेच्या कोमात गेलेल्या अर्थव्यवस्थेला जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेचे आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून दिल्ली येथील इलेक्ट्रॉन एनर्जी एफिशिएन्सीलाच नवीन १७ हजार एलईडी दिवे लावण्याचे काम दिले असून मार्चअखेरपर्यंत कंपनीने हे काम पूर्ण करून देण्याचे आदेश दिले आहेत. विशेष बाब म्हणजे, या कामासाठी महापालिका कंपनीला एक रुपयाही देणार नाही हे विशेष.
शहरातील जुने ४० हजार पथदिवे बदलून वीज बचतीचे नवे एलईडी पथदिवे लावण्याचे कंत्राट महापालिकेने १२० कोटी रुपयांत दिले आहे. या निविदेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इलेक्ट्रॉन एनर्जी एफिशिएन्सी या जुन्याच एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. एजन्सीने काम पूर्ण केले असून, महिन्याला ६० ते ७० लाख रुपयांचे पथदिव्यांचे बिल कमी झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. १२० कोटी रुपयांच्या निविदेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात आणखी १७ हजार जुने पथदिवे असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान, केंद्र शासनाने एलईडी दिवे लावण्यासाठी देशभर एजन्सी नियुक्त केल्या आहेत. या एजन्सीमार्फत १७ हजार दिवे लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला, पण नंतर हे काम इलेक्ट्रॉन एनर्जी एफिशिएन्सी या जुन्याच एजन्सीलाच देण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. तसेच हे काम ३१ मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मनपाकडून साडेपाच कोटींची तरतूद
१७ हजार दिवे लावण्यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क एजन्सीला दिले जाणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, या कामासाठी ५.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निविदेच्या पार्ट बी अंतर्गत २५.२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रकमेतून ५.५० कोटींची तरतूद करण्यात येत आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
---------------