छत्रपती संभाजीनगर : आपल्याला एक नृत्यांगणा व्हायचे होते, मात्र, पहिल्यांदा अभिनय केला आणि लक्षात आले की, आपल्याला यापुढे अभिनयच करायचा आहे. अन एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रेरक प्रवास ऑस्करपर्यंत पोहचला, अशा शब्दात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ख्यातनाम अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी त्यांचा जीवन प्रवास उलगडला.
दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय सिनेमा स्पर्धेच्या ज्यूरी पर्सन सीमा बिस्वास यांची प्रकट मुलाखत शुक्रवारी प्रा. शिव कदम यांनी प्रोझोन मॉलच्या आयनॉक्स सिनेमागृहात घेतली. यावेळी प्रा. कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी सडेतोड आणि शांतपणे उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, ‘बॅडिंट क्वीन’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी ३ दिवस झोपले नव्हते. तेव्हा आपणच ही भूमिका केवळ करू शकते असे आपल्या लक्षात आले. बॅडिंट क्वीन चित्रपटात काम करण्याचा अनुभव हा आयुष्यभर लक्षात राहील, असा होता. ‘बॅडिंट क्वीन’नंतर मला स्वत:ला मी एक वादग्रस्त अभिनेत्री नसून अभिनेत्री आहे, हे सिद्ध करायचे होते म्हणून मी 'खामोशी' हा चित्रपट केला असल्याचे अभिनेत्री सीमा यांनी सांगितले.
अभिनयाच्या क्षेत्रात येणाऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल असे विचारले असता त्या म्हणाल्या की, त्यांना मी कायम सांगत असते की, आपण कोणतीही भूमिका प्रामाणिकपणे केली पाहिजे. चित्रपटातील भूमिकांमधून प्रेरणा घ्यावी, त्यांना आपण कॉपी करू नये, कॉपी केल्यामुळे मूळ भूमिकेतील आत्मा नष्ट होतो. आपण भूमिका करण्याच्या प्रक्रियेतून जात असताना ती भूमिका जगली पाहिजे. तरच त्या भूमिकेला न्याय देता येतो. आपल्यावर होणाऱ्या टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा आपण आपले काम जोरकसपणे करत राहिले पाहिजे. आपले उत्तम आणि दर्जेदार काम हेच टिकेला उत्तर असते, असेही त्यांनी नमूद केले.