अजिंठ्याच्या गोडंबीचा ‘गोडवा’ देशभरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:07 AM2021-01-16T04:07:21+5:302021-01-16T04:07:21+5:30

सिल्लोड : अजिंठ्याच्या डोंगर रांगात विपूल जैवविविधता दडलेली आहे. हळदा, वसई, पिंपळदरी, लेणापूरपासून आमसरीपर्यंत भिलाव्याची (बिब्बाची झाडे) हजारो झाडे ...

Ajanta 's sweet' Godava 'all over the country | अजिंठ्याच्या गोडंबीचा ‘गोडवा’ देशभरात

अजिंठ्याच्या गोडंबीचा ‘गोडवा’ देशभरात

googlenewsNext

सिल्लोड : अजिंठ्याच्या डोंगर रांगात विपूल जैवविविधता दडलेली आहे. हळदा, वसई, पिंपळदरी, लेणापूरपासून आमसरीपर्यंत भिलाव्याची (बिब्बाची झाडे) हजारो झाडे या भागात आहेत. या झाडापासून मिळणाऱ्या बिब्बापासून मिळणाऱ्या गोडंबीचा गोडवा देशभर पोहोचलेला आहे. बाहेर ही अजिंठा डोंगरातील गोडंबी म्हणून विकली जाते. औषधी उद्योगात गोडंबीला प्रचंड मागणी असून, सिल्लोड तालुक्यात यासाठी संशोधन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. आजही पारंपरिक पद्धतीने दगडाने गोडंबी फोडण्याचे काम या भागात होते.

अजिंठा डोंगररांगांत भिलाव्याची झाडे निसर्गतः उगलेली आहेत. भिलावा फोडून त्यातून गोडंबी काढण्याचे कष्टाचे काम कोळी व भिल्ल समाजबांधव वर्षानुवर्षे करीत आहेत. तालुक्याच्या ज्या भागात भिलाव्याची झाडे अधिक त्या भागात कोळी समाजबांधवांची संख्याही आपसूकच अधिकच आढळते. ही झाडे या भागात शेकडो वर्षांपासून आहेत. शेकडो लोकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. या कल्पवृक्षास डिसेंबरमध्ये फूल व फळधारणेस सुरुवात होते. व संक्रांतीच्या वेळी बिब्बे सुकायला लागतात. भिलाव्यातून गोडंबी फोडण्याचा मोठा उद्योग हळदा, वसई, उंडणगाव परिसरात चालतो. येथील गोडंबीचा दर्जा सर्वोत्तम असून, देशभर तिला मोठी मागणी असते. गोडंबीला औषधी उद्योगात मोठी मागणी असल्याने यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला येथे मोठा वाव आहे. येथे कच्च्या मालाची मुबलक उपलब्धता होत असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या भागात परंपरागतरीत्या आजही दगडाने गोटे फोडले जातात. विशेष अशी उपकरणे याकामी उपलब्ध नसल्याने हातानेच हे जोखमीचे काम करावे लागते.

चौकट

काजूसारखी गुणधर्मे

भिलावा हा काजू वृक्षाचा सख्खा भाऊ आहे. हे दोन्ही वृक्ष ‘अनाकार्डियसी’ कुटुंबातील असून, दोघांची पाने सारखीच आहेत. दोन्ही वृक्षांना फळाच्या बाहेर ‘बी’ येते. तसेच दोघांचे गुणधर्मही सारखे आहेत. चौकट

यासाठी होतो वापर

भिलाव्याच्या गोडंबीचा वापर हिवाळ्यात पौष्टिक लाडू आदी जिन्नस बनविण्यासाठी उपयोगात येतो. या सुकामेव्या व्यतिरिक्त बिब्बे हेदेखील खाण्यास वापरले जातात. गोट्याच्या तेलाचा वापर वंगन म्हणून करतात. तसेच वॉटर प्रूफिंग, कीडनाशक, लाकडास वाळवी लागू नये यासाठी या तेलाचा लेपण करतात. तसेच रंग उद्योगात त्याला मोेठी मागणी आहे.

चौकट

औषधी तेलद्रव्य कर्करोगावर उपयोगी

गोटे फोडल्यावर त्यातील गरी म्हणजे गोडंबी अत्यंत पौष्टिक सुकामेवा आहे. यात प्रथिने व कर्बोदके, लोह, कॅल्शियम विपूल मात्रेत आहेत. ती शरीरात उष्णता वाढविते म्हणून हिवाळ्यात ती लाडू आदी पदार्थ बनविताना वापरतात. गुणाने तीक्ष्ण व वीर्यवर्धक असल्याने पुरुषांसाठी बलदायी आहे. स्मरणशक्ती वाढवणारी आहे. भिलाव्याच्या टरफलापासून ‘अनाकार्सीन’ नावाचे औषधी तेलद्रव्य निघते ते कर्करोगावर उपयोगी सिद्ध झाले आहे.

कोट

रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचा गुणधर्म गोडंबीत आहे. दहा ग्राम गोडंबीतून ६० कॅलरी मिळतात. वनविभागाने व शेतकऱ्यांनी विदेशी झाडे न लावता भिलाव्यासारखी देशी व परोपकारी झाडे लावावीत. भिलाव्याचे झाड जर कापले तर त्या लाकडातून हानिकारक क्षोभक तत्त्वे निघतात व कापणाऱ्यास ॲलर्जी उद्भवून चेहरा सुजतो म्हणून त्यास कोणी तोडत नाहीत. झाड तोडू नये म्हणून निसर्गानेच हे संरक्षण या झाडास बहाल केले आहे.

-डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड

फोटो : भिलाव्याची झाडे...

Web Title: Ajanta 's sweet' Godava 'all over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.