नाचनवेल : परिसरातील टाकळी (शाहू) येथील शेतकरी मंजितराव चिकणे यांनी आपल्या शेतात तीन एकर उसाची लागवड केली. पीक जोमात आले असून त्यातील गवत जाळण्यासाठी त्यांनी तणनाशक फवारणी केली. मात्र, दुकानदाराच्या अज्ञानाचा फटका त्यांना बसल्याने तीन एकरांतील ऊस जळून गेला आहे. याबाबत त्यांनी दुकानदाराकडे तक्रार केली असता त्याने हात वर केले. अखेर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी देखील कारवाई करण्याऐवजी कानाडोळा केला आहे.
शेतकरी मंजितराव चिकणे यांनी २० एप्रिल रोजी अंधारी येथील एका कृषी केंद्रातून दुकानदाराच्या सल्ल्याने तणनाशक औषधी खरेदी केली. त्यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांनी दुकानदाराने सांगितल्याप्रमाणे फवारणी केली. मात्र, अवघ्या आठवडाभरात त्यांचा हिरवागार ऊस वाळू लागला. अखेर त्यांनी दुकानदाराकडे धाव घेत घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा दुकानदाराने यात माझी काहीच चूक नसून कंपनीकडे बोट दाखवले. त्यानंतर तणनाशक उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधीने पाहणी करून दुकानदारानेच चुकीचे औषध दिल्याचा दावा केला. दीड लाखांवर खर्च करून मोठ्या कष्टाने उगवलेल्या उसाचे वाटोळे झाले. यात दुकानदार आणि कंपनीच्या कचाट्यात ते अडकले.
कृषी विभागाचे ठोठावले दार
चिकणे यांनी अखेर कृषी विभागाचे दार ठोठावले. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. तक्रार करून आठ दिवस झाले तरी देखील अधिकाऱ्यांनी पाहणीदेखील केली नाही. सदर शेतकऱ्याची सर्वच यंत्रणा कुंचबणा करीत असून, मला खरंच न्याय मिळणार आहे का, असा प्रश्न शेतकरी मंजितराव चिकणे यांनी उपस्थित केला आहे.
फोटो : तणनाशक फवारणीनंतर जळालेला ऊस.
270521\screenshot_20210527-165718_gallery_1.jpg
तणनाशक फवारणी नंतर जळून गेलेला ऊस