छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी अंबादास आबाजी मानकापे याचा दुसरा जामीन अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शौकत एस. गोरवडे यांनी फेटाळला. यापूर्वी मानकापेचा जामीन अर्ज दोषारोपपत्रातील माहितीआधारे नामंजूर करण्यात आला होता. अद्याप परिस्थितीत कुठलाही बदल झाला नाही, असे नमूद करीत न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला.
२०१९ ते २०२२ या तीन आर्थिक वर्षांत पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे लेखा परीक्षण अहवालातून समोर आले होते. संस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे व संचालक मंडळाने बनावट कर्ज प्रकरणे तयार करून कोट्यवधींची कर्जे वितरित केली होती. पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने एकमेकांना जामीनदार करून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. काही संचालक व त्यांच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या मालकीच्या नऊ संस्थांना कोट्यवधी रुपयांची कर्जे मंजूर करून अपहार केला. काही प्रकरणांमध्ये जामीनदार व कागदपत्रे बनावट होती, असे तपासादरम्यान आढळले होते.
मानकापे तर्फे युक्तिवादआरोपींची मालमत्ता आणि आनुषंगिक कागदपत्रे जप्त केली आहेत. मानकापे एक वर्षापासून कारागृहात आहे. इतर संचालकांना जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या विशेष मोहिमेनुसार इतर आरोपींसोबत मानकापेलासुद्धा ‘पॅरिटी’च्या मुद्द्यावर जामीन मिळू शकतो, असा युक्तिवाद मानकापेतर्फे करण्यात आला.
जामिनास विरोधराज्य सरकारतर्फे विशेष सरकारी अभियोक्ता कोमल कंधारकर यांनी जामिनास विरोध केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मानकापे सोसायटीचा अध्यक्ष होता. कर्ज मंजूर करण्यापूर्वीच वितरित करण्यासाठी मानकापे कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत होता. जामीन मंजूर झालेले इतर आरोपी सोसायटीचे संचालक होते. म्हणून मानकापेला ‘पॅरिटी’चा मुद्दा लागू होत नाही.