छत्रपती संभाजीनगर : काम देण्याच्या मागण्यासाठी ‘रिपाइं’च्या पदाधिकाऱ्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्यांनी कार्यकारी संचालकांच्या वाहनासमोर झोपून गोंधळ घातल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेच्या निषेधार्थ महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शिवाय पोलिस आयुक्तांची भेट घेऊन संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
या निवेदनात म्हटले की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार हे सोमवारी सायंकाळी सिंचन भवन येथील त्यांच्या कार्यालयात बसलेले होते. यावेळी रिपाइं युवा मोर्चाचे पदाधिकारी जयकिशन कांबळे हे कार्यकर्त्यांसह तेथे गेले. त्यांनी तिरमनवार यांच्याकडे कामाची मागणी केली. कार्यकारी संचालकांनी त्यांना ते काम आपले नसल्याचे त्यांना सांगितले. याचा राग आल्याने त्यांनी त्यांच्याजवळील बाटलीमधील रॉकेल अंगावर ओतून घेतले. सुरक्षारक्षकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिरमनवार आणि सुरक्षारक्षकाच्या अंगावरही रॉकेल उडाले. नंतर तिरमनवार सरकारी वाहनाने बाहेर जाऊ लागताच कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारसमोर झोपून त्यांना जाऊ देण्यास मज्जाव केला. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
तिरमनवार यांना ॲट्रॉसिटीची धमकीजयकिशन कांबळे यांनी यापूर्वीही कार्यकारी संचालकांच्या दालनामध्ये असंसदीय भाषेचा वापर करून कामाची मागणी केली होती. काम द्या नाही तर तुमच्यावर ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करतो व तुमच्यावर केसेस करतो, अशी धमकी दिल्याचे पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनया घटनेच्या निषेधार्थ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले. अधिकारी, कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना भेटले. त्यांना निवेदन देऊन कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता सचिन पाटील, लेखाधिकारी के. बी. धोत्रे, लेखाधिकारी के. एच. राजपूत, रुख्यिया बेगम, अनिल भोंडे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
तीन पोलिस कर्मचाऱ्यांची सुरक्षापोलिस आयुक्त कार्यालयात निवेदन दिल्यानंतर आयुक्तांनी कार्यकारी संचालकांना तीन पोलिस कर्मचाऱ्यांची सुरक्षा पुरवण्याचे आदेशित केले. यानंतर लगेच पोलिस आयुक्तालयाकडून सुरक्षा पुरवण्यात आली.
आंदोलन, पोलिस आयुक्तांच्या भेटीनंतर कांबळेवर गुन्हासोमवारच्या जयकिशनच्या राड्यानंतर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे मंगळवारी दुपारी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन तक्रार नोंदविण्याची वेळ आली. सतत कंत्राटासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करावे लागते, अशी तक्रारच त्यांनी पवार यांच्याकडे केली. विभागाचे शिपाई अण्णा झरेकर यांच्या तक्रारीनंतर जवाहरनगर पाेलिस ठाण्यात जयकिशन कांबळे व त्याच्या पाच साथीदारांवर बीएनएस कलम ३०८ (२), १३२, १२५, १२६ (२), १८९ (२), १९०, १९०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक अशोक शरमाळे यांनी सांगितले.