हिंगोली : वसमत नगरपरिषदेने शहराच्या हद्दीत सर्वे नं. ३९ मध्ये प्रस्तावित केलेला कत्तलखाना रद्द करण्याच्या मागणीसाठी १९ मेपासून वसमत तालुका गोवंश वाचवा कृती समितीने वसमतच्या उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा पाचवा दिवस होता. कृती समितीने उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देऊन नगर परिषदेने वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, कमलकिशोर सोनी, गौतम दातार, रामराव बलखंडे, भीमराव जाधव यांच्या स्वाक्षर्या आहेत. जनता दल (सेक्युलर)ने दिलेल्या निवेदनात कत्तलखाना किती एकर क्षेत्रफळात होणार, जमिनीची आर्थिक किंमत, क्षेत्रफळ, त्यात कत्तल होणार्या जनावरांची संख्या, शहरापासूनचे कि.मी. मधील अंतर, हवामान व नद्यांच्या प्रदूषणाचे होणारे टक्क्यांमधील वाढीचे प्रमाण यासह नगर परिषदेला होणारे वार्षिक फायदे व किती वर्षे जमीन वापरायची व परतीची मुदत असे असंख्य प्रश उपस्थित केले आहेत. निवेदनावर शहर अध्यक्ष सुभाष अंबेकर, उपाध्यक्ष मुबीन सिद्दीकी, पक्ष संघटक केशव व्हडगीर यांच्या सह्या आहेत. वसमत शहरातील राष्टÑमाता सेवाभावी संस्थेने कृती समितीला पाठिंबा देणारे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना सादर केले असून नियोजित कत्तलखाना रद्द करण्याची मागणी केली आहे. धरणे आंदोलनकर्त्यास न्याय देण्याची विनंतीही निवेदनात केली आहे. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख मतीन शेख पाशा, सचिव फरजाना बेगम हलीम, शेषराव साळवे यांच्या स्वाक्षर्या आहेत. दरम्यान, धरणे आंदोलनास शहर व तालुक्यातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष विशाल अग्रवाल यांनी दिली आहे. वाय.एम. कासार, पांडुरंग देसाई, सय्यदलाल अली, मुंंजाजी आगलावे, गंगाधर आगलावे, दामाजी जाधव, देवानंद नाईवाडे, गंगाधर खंदारे, देवीदास कल्याणकर, लक्ष्मण धुडूम, निसार अहेमद, माजीद आदी नागरिकांनी धरणे आंदोलनास भेट देवून पाठिंबा दिला आहे. (प्रतिनिधी)
कृती समितीचे धरणे आंदोलन सुरूच
By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST