परभणी : मानवत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणपतराव मेथे व वरिष्ठ सहाय्यक मिर्झा बेग यांना पाच हजारांंची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधीक्षक एन. व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल गायकवाड यांनी केली. तेराव्या वित्त आयोगांतर्गत आंबेगाव (डीगर) या गावातील अंगणवाडी समोरील नाल्यावर ढापा टाकण्याचे काम सदरील तक्रारदाराने पूर्ण केले होते. या कामाचे बील ४८ हजार ६१३ रुपये मिळाले नसल्याने २० जून रोजी गटविकास अधिकारी मेथे यांना भेटून बिलाचा धनादेश देण्याची मागणी केली. त्यांनी पाच हजार रुपये वरिष्ठ सहाय्यक बेग यांच्याकडे आणून द्या, असे सांगितले, असे तक्रारीत नमूद केले आहे. २४ जून रोजी गटविकास अधिकारी मेथे यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी करून कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक बेग यांच्याकडे आणून देण्यास सांगितले. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी मानवत पं. स. कार्यालय परिसरात सापळा रचून बेग यांनी ५ हजार रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारली असता ती रक्कम त्यांच्या ताब्यातून हस्तगत केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक अनिल गायकवाड, पो. नि. दीपक तंदूलवार, पो. नि. विकास पाटील, पोलिस नायक चंदन परिहार, शिवाजी भोसले, राजू ननवरे, लक्ष्मण मुरकुटे, सुुनील गरुड, सचिन गुरसुरकर, श्रीकांत कदम, अविनाश पवार, जगन्नाथ भोसले, डुब्बे, वाहनचालक बोके यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे लाच स्वीकारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)लाच घेणाऱ्यांचे धाबे दणाणले लाचलुचपत प्रतिबंध विभागात काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलिस उपअधीक्षक अनिल गायकवाड यांनी जिल्ह्यात केलेल्या कारवाईमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करीत असतील तर नागरिकांनी स्थागुशाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक अनिल गायकवाड यांनी केले आहे.
गटविकास अधिकारी, सहाय्यकाविरुद्ध कारवाई
By admin | Updated: June 25, 2014 00:35 IST