छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवात गँगस्टर लॉरेंस बिश्नोईच्या छायाचित्रासह कट्टर विचारसरणीचे प्रदर्शन करणाऱ्या संशयिताला क्रांतीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या आदेशानंतर क्रांतीचौक पोलिसांनी गुरुवारी त्याचा शोध घेतला. दर्शन उर्फ विशाल शाम पवार (साळुंखे) (२१, रा. भवानीनगर, रोहिदासपुरा) असे संशयिताचे नाव आहे.
बुधवारी सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी झाली. शिवप्रेमींची शिस्त व पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे शहर तसेच जिल्ह्यात शिवजयंती निर्विघ्न पार पडली. मात्र, क्रांतीचौकातील उत्सवात आंतरराष्ट्रीय गँगस्टर लॉरेंस बिश्नोईचे पोस्टर झळकल्याने मोठे वादंग उठले. शहर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. पोलिस उपायुक्त बगाटे यांनी क्रांतीचौक पोलिसांना त्याला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी तो दर्शन असल्याचे निष्पन्न होताच, उपनिरीक्षक अशोक इंगोले यांच्या पथकाने तत्काळ त्याला ताब्यात घेतले.
पोस्टर तयार करणाऱ्याचा शोधदर्शन मजुरी करतो. उत्सवात सहभागी होण्यासाठी आल्यानंतर दुपारी त्याने गर्दीत एकाच्या हातातून ते पोस्टर घेऊन हवेत भिरकावले. त्याच्या दाव्यानुसार, ते पोस्टर त्याने केले नाही. गर्दीत एकाच्या हातातले घेतल्यानंतर त्याने हातात घेऊन वर धरले, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पोस्टर नेमके काेणी तयार केले, त्यांचा उद्देश काय होता, ते कुठल्या संघटनेशी जोडले गेले आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे उपायुक्त नितीन बगाटे यांनी सांगितले.
गुप्तचर यंत्रणांकडून तपास सुरूशहर पोलिसांसह गुप्तचर यंत्रणांकडून शहरातील बिश्नोई समर्थकांची माहिती गोळा केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून मराठवाड्यात बिश्नोई समर्थक वाढत असल्याची माहिती केंद्रीय तसेच राज्याच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. बुधवारच्या घटनेनंतर याप्रकरणी तपास मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.छायाचित्र