छत्रपती संभाजीनगर : पोलिसांच्या सातत्याने बैठका, समन्वय व समुपदेशनाद्वारे शहरातील १९०६ प्रार्थनास्थळावरील ६ हजार ५९१ भोंगे उतरवण्यात आले. यात ९३७ मोठ्या धार्मिक स्थळांवरील नियमबाह्य ५६२२ भोंगे निघाले. उर्वरित ९६९ स्थळांना एका भोंग्याची अनुमती देण्यात आली. ही सर्व मोहीम निर्विघ्नपणे पार पडली असून, शांत व समंजस शहरवासीयांमुळेच हे घडल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.
ध्वनिप्रदूषणासंदर्भात दाखल याचिकेवर निकाल देताना जानेवारीत उच्च न्यायालयाने बेकायदेशीर भोंग्यांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मे-जूनमध्ये मुंबई पोलिसांनी भोंगे काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अन्य ठिकाणच्या पोलिसांना सूचना केल्या. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी जुलैत ही मोहीम हाती घेतली. सर्व ठाणे प्रभारींना बैठका घेऊन योग्य समन्वय साधत नियमबाह्य लाऊडस्पीकर काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ही मोहीम घेतल्याचे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
शहरात १९०६ धार्मिक स्थळेमंदिर -१०९३मशीद -५४५बुद्ध विहार -१४९गुरुद्वारा -४दर्गा -७४चर्च-४१
काय आहेत नियम?- प्रार्थनास्थळांवर लाऊडस्पीकरसाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक- रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कुठलेच भोंगे वाजणार नाहीत- या वेळेतही ५५ डेसिबलपर्यंतच परवानगी. भंग झाल्यास कायदेशीर कारवाई.
डेसिबल मर्यादाक्षेत्र : सकाळी ६ ते रात्री १० - रात्री १० ते सकाळी ६औद्योगिक भाग : ७५-७०व्यावसायिक भाग : ६५-५५निवासी भाग : ५५-४५शांतता क्षेत्र : ५०-४०
पोलिस महासंचालकांच्या सूचनासूचना करूनही प्रार्थनास्थळ किंवा कुठेही डेसिबलच्या नियमांचा भंग होत असेल, तर महाराष्ट्र प्रदूषण मंडळासोबत पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. कारवायांचा मासिक अहवाल प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी देत २१ जुलै रोजी कठोर कार्यपद्धती ठरवून दिली.
विशिष्ट कारण वगळता परवानगी नाहीचलाऊडस्पीकरला परवानगी देताना जमिनीची मालकी, बांधकाम परवाना, स्थानिक संस्थांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक असतील. मर्यादित कालावधीचे विशिष्ट कार्यक्रम वगळता कोणत्याही मोकळ्या जागेत, झाडे, शासकीय, खासगी इमारतींवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी न देण्याची सूचना आहे. अनधिकृत वास्तूला परवानगी नसेल. अनधिकृत भोंगे आढळल्यास पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरले जाईल. शिवाय जिल्ह्यात तपासणीसाठी पथके नेमण्याचे आदेश आहेत.