- योगेश गोलेछत्रपती संभाजीनगर: संकल्पनांची स्पष्ट समज, सातत्यपूर्ण अभ्यास आणि बौद्धिक शिस्त यांच्या जोरावर छत्रपती संभाजीनगरातील हुशार विद्यार्थी राजन काबरा याने मे २०२५ मध्ये झालेल्या सीए फायनल परीक्षेत अखिल भारतीय प्रथम क्रमांक (AIR-1) पटकावला, असे धवल यश मिळवणारा तो शहरातील पहिलाच विद्यार्थी असल्याने छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.
"मला आयसीएआयच्या टॉप ५० यादीत नात येईल अशी अपेक्षा होती; पण आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए चरणजीत सिंग नंदा यांनी मला फोन करून 'तू देशात पहिला आला आहेस' सांगितल्यावर मला अत्यानंदाने काही सुचेनासे झाले. तो आनंद पचवायला थोड़ा वेळ लागला," असे राजनने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
दुर्मीळ हॅटट्रिक पूर्ण केलीजुलै २०२१ मध्ये त्याने सीपीटी (आताचे फाउंडेशन) परीक्षेत ३७८/४०० गुणांसह देशात प्रथम क्रमांक पटकावला. मे २०२२ मध्ये CA इंटरमिजिएट परीक्षेतही तो देशात पहिला आला आणि आता फायनलमध्येही प्रथम क्रमांक पटकावून त्याने दुर्मीळ हॅटट्रिक पूर्ण केली. राजन हा टेंडर केअर स्कूल आणि देवगिरी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून, पुणे विद्यापीठातून कॉमर्स पदवीधर आहे. केपीएमजीमध्ये त्याने आर्टिकलशिप केली. सध्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये तो प्रशिक्षण घेत आहे.
कुटुंबाचा भक्कम पाठिंबाकधी थकवा जाणवला का? या प्रश्नावर राजन म्हणाला, "हो, पण अशावेळी माझे वडील सीए मनोज काबरा, आई सुवर्णा आणि बहीण डॉ. ऐश्वर्या यांनी मला नेहमी चीर दिला. सीए मनोज काबरा हे टेंभुर्णी, जिल्हा जालना येथील आहेत. डॉ. ऐश्वर्या ही सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे एमडी स्त्रीरोगशास्त्र प्रथम वर्षाला आहे.
शेवटच्या चार महिन्यांत रिव्हिजन, वेगवेगळे क्लासआर्टिकलशिपदरम्यान वेळ काढून राजन दररोज २ ते २.५ तास नियमित अभ्यास करत होता. "शेवटच्या चार महिन्यांच्या अभ्यासासाठीच्या सुटीत मी संपूर्ण रिव्हिजन केले. वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे कोचिंग घेतले," असे त्याने सांगितले.