महलला ‘सोनेरी’ दिवस, दुसरीकडे ‘दख्खनचा ताज’चा ऐतिहासिक वारसा धोक्यात

By संतोष हिरेमठ | Published: April 18, 2024 06:09 PM2024-04-18T18:09:53+5:302024-04-18T18:09:53+5:30

जागतिक वारसा दिन विशेष: सोनेरी महलसंदर्भात याचिका दाखल होताच ३.९३ कोटींचा निधी, बीबी का मकबऱ्याच्या संवर्धनाच्या फक्त गप्पाच

A 'golden' day for the Soneri Mahal, while the historical heritage of the 'Crown of the Deccan' is in jeopardy | महलला ‘सोनेरी’ दिवस, दुसरीकडे ‘दख्खनचा ताज’चा ऐतिहासिक वारसा धोक्यात

महलला ‘सोनेरी’ दिवस, दुसरीकडे ‘दख्खनचा ताज’चा ऐतिहासिक वारसा धोक्यात

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील सोनेरी महल आणि त्यातील शिल्प, चित्रांसह मौल्यवान ऐवजांचे संरक्षण होत नसल्यासंदर्भात जनहित याचिका दाखल होताच या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व दुरुस्तीसाठी ३.९३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने सोनेरी महलला पुन्हा एकदा ‘सोनेरी’ दिवस येणार आहे. त्याउलट जगप्रसिद्ध ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबऱ्याला काळे दिवस आल्याची स्थिती आहे. हा मकबरा दिवसेंदिवस काळवंडत असून, जागोजागी पडझड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा धोक्यात आला आहे.

दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा करण्यात येतो. मात्र, भविष्यात हा दिवस साजरा करताना बीबी का मकबरा राहील का, असा प्रश्न सध्याच्या स्थितीवरून पर्यटक आणि इतिहासप्रेमींना भेडसावत आहे. मिनार आणि मकबरा ठिकठिकाणी काळवंडला आहे. मिनारचे प्लास्टरही उखडले आहे. लवकरच त्याच्या प्लास्टरचे काम हाती घेतले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, वर्ष उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही. मकबऱ्यावरील नक्षीकाम आणि प्लास्टर जागोजागी उखडून गेले आहे. एकीकडे ही अवस्था आहे, तर दुसरीकडे जनहित याचिकेमुळे सोनेरी महलची दुरवस्था दूर होत असल्याची परिस्थिती आहे.

फक्त मुख्य प्रवेशद्वार, नक्षीकाम उजळले
गेल्या ३ वर्षात बीबी का मकबऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील भिंती, आत नक्षीकाम असलेल्या घुमटाच्या संवर्धनाचे काम करण्यात आले. परंतु, मकबरा आणि चारही मिनारच्या दुरवस्थेकडे कोणाचेही लक्ष जात नाही.

प्रस्ताव सादर, लवकरच संवर्धनाचे काम
बीबी का मकबऱ्याच्या देखभाल-दुरुस्ती आणि संवर्धनाच्या कामाचा प्रस्ताव पाठविलेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच मकबऱ्याच्या संवर्धनाचे काम होईल.
- डाॅ. शिवकुमार भगत, अधीक्षक (अधीक्षण पुरातत्त्वविद), भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण

Web Title: A 'golden' day for the Soneri Mahal, while the historical heritage of the 'Crown of the Deccan' is in jeopardy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.