छत्रपती संभाजीनगर : पोलिस ठाण्याच्या आवारातील झाडावर नायलॉन मांजात अडकलेल्या पक्षाचे उपनिरीक्षकाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिन्सी पोलिस ठाण्यात ही घटना घडली.
गेल्या दोन महिन्यांत शहरात नायलॉन मांजामुळे जवळपास ३० पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. जीवघेण्या नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्वत्र त्याची सर्रास विक्री झाली. यात अडकून अनेक पक्षी देखील मृत्यूमुखी पडले.
दरम्यान, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे हे तपासकामी जिन्सी पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी त्यांना ठाण्यासमोरील एका झाडावर एक पक्षी विव्हळताना आढळून आला.आवाजामुळे बोडखे यांचे पक्षाकडे लक्ष गेले. बारकाईने पाहिल्यानंतर तो पक्षी जीवघेण्या नायलॉन मांजात अडकून पडला होता. त्यामुळे त्याला उडता येत नव्हते. तसेच हालचाल केल्याने जखमा होऊन तो तडफडत होता.
हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून बोडखे यांनी तत्काळ झाडाकडे धाव घेतली. पक्षाला झाडावरुन काढत त्याच्या भोवती गुंडाळला गेलेला मांजा त्यांनी अलगद काढला. जीवघेण्या नायलॉन मांजातून मुक्त झाल्याने त्यानंतर पक्षाने क्षणात आकाशात उंच भरारी घेतली.