- श्यामकुमार पुरेसिल्लोड: कर्ज थकीत असतांना संचालकपद भोगणाऱ्या सिध्देश्वर शिक्षक पतसंस्थेच्या ९ संचालकांना सिल्लोड येथील सहायक निबंधक व्ही. यू. लकवाल यांनी ९ सप्टेंबर रोजी अपात्र घोषित केले. १५ संचालकापैकी ९ पदे रिक्त झाल्याने सहायक निबंधक व्ही. यू.लकवाल यांनी या शिक्षक पतसंस्थेचे सर्वच संचालक मंडळ १० सप्टेंबर रोजी बरखास्त केले आहे. तर प्रशासक म्हणून अब्दुल वहिद यांची ११ सप्टेंबर रोजी नेमणूक करण्यात आली आहे.
थकीत कर्ज असतांना निवडणूक लढवून संचालक पद भोगणाऱ्या वैभव कुलकर्णी, संदीप काकडे, गणेश धनवई, मिलिंद घोरपडे, मंगल जाधव, रणजीत खेडकर, सागर पालोदकर, भालचंद्र राकडे, शशिकांत सावंत या ९ संचालकांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती सहायक निबंधक व्ही. यू.लकवाल यांनी दिली.
२० फेब्रुवारी २०२३ रोजी या पतसंस्थेची निवडणूक झाली होती. यावेळी थकबाकीदार असतानाही वैभव कुलकर्णी, संदीप काकडे, गणेश धनवई, मिलिंद घोरपडे, मंगल जाधव, रणजीत खेडकर, सागर पालोदकर, भालचंद्र राकडे, शशिकांत सावंत यांनी निवडणूक लढवली आणि संचालक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर या ९ संचालकांविरुद्ध सहायक निबंधकयांच्याकडे आक्षेप घेण्यात येऊन अपात्र करण्याची सन २०२३ मध्ये तक्रार करण्यात आली. चौकशीअंती वरील ९ संचालक यात दोषी आढळले. यामुळे ९ सप्टेंबर रोजी सहायक निबंधक व्ही.यू. लकवाल यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कअ १ (एक) (ब) व (ड) नुसार सिध्देश्वर शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या या ९ संचालकांना अपात्र घोषित केले.
या संस्थेवर एकूण १५ संचालक निवडून आले होते. त्यापैकी ९ संचालक अपात्र ठरल्याने कोरम पूर्ण होत नसल्याने सहायक निबंधक व्ही.यू. लकवाल यांनी १० सप्टेंबर रोजी संचालक मंडळ बरखास्त करून पतसंस्थेवर प्रशासक नेमला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.