जमील मुंशी पठाण (वय ३३, रा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वाकडी(ता. भोकरदन) येथील शेतकरी अहेमद खान अमीर खान हे कापूस विक्री करून १ डिसेंबर रोजी ७० हजार रुपये घेऊन शहरात आले. हडको कॉर्नर येथून रहेमानियाॅ कॉलनी येथे राहणाऱ्या मुलाकडे ते रिक्षाने जात असताना आरोपी जमील सहप्रवासी म्हणून रिक्षात त्यांच्याशेजारी बसला. यावेळी त्याने त्यांचा खिसा कापून रक्कम लंपास केली. काही अंतरावर तो रिक्षातून उतरून निघून गेला होता. याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना रेकॉर्डवरील आरोपी जमील हा शरद टी पॉईंट येथे पोलिसांना पाहून पळून जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार, संतोष मुदीराज आणि इरफान खान यांना दिसले. त्यांनी पाठलाग करून जमीलला ताब्यात घेतले. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने अहेमद खान यांचा खिसा कापून ७० हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. यापैकी घरात ठेवलेले १८ हजार ६०० रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले. उर्वरित रक्कम खर्च झाल्याचे त्याने सांगितले.
शेतकऱ्यांचा ७० हजारांचा खिसा कापणारा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:24 IST