औरंगाबाद : आगामी काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार आहे. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यूसह विविध आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभाग कामाला लागला आहे. गेल्या अडीच वर्षांत जिल्ह्यात ३८ हिवताप रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी जून महिना हिवताप प्रतिरोध म्हणून साजरा केला जाणार आहे. यासाठी ‘एक दिवस एक कार्यक्रम’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हा उपकेंद्रांवरून राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकुन गुनिया इ. आजारांविषयी जनजागृती केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून जून महिना हिवताप प्रतिरोध म्हणून साजरा केला जात आहे. यामध्ये महिनाभर ‘एक दिवस एक कार्यक्रम’ घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. डासांच्या अळीचे नियंत्रण ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे महिनाभर रॅली, ग्रामसभा, प्रदर्शन, हस्तपत्रिकांचे वाटप, दिंडी, विविध स्पर्धा इ. उपक्रमांतून हिवतापाविषयी जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी संजय मुळे यांनी दिली.
गेल्या अडीच वर्षांत हिवतापाचे ३८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 23:45 IST