छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीवर सामाजिक जबाबदारी दिलेली आहे. त्या जाणिवांनी काम केलं गेलं पाहिजे. आम्ही सर्व रुग्णावर मोफत उपचार करणार आहोत. आमच्या ओपीडीला सर्व तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. सर्व डॉक्टरांनी वर्गणी जमा करून ही ओपीडी सुरू केली, अशी माहिती डाॅ. प्रमोद दुथडे यांनी दिली.
शहरातील बहुजन समाजातील ३५० डॉक्टर एकत्र येऊन डॉ. आंबेडकर डॉक्टर असोसिएशन (DAMA) हेल्थ केयर फाउंडेशन स्थापना केली आहे. फाउंडेशनमार्फत ३६५ दिवस मोफत अमरप्रीत चौकातील बाह्य रुग्ण सेवेच्या रुग्णालयाचे उद्घाटन तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून रविवारी झाले.
सेवेची संधी मिळतेय...फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मुळेच बहुजनांना शिक्षणाची संधी मिळाली. वैद्यकीय सेवेसारख्या महत्वाच्या क्षेत्रात येता आले. त्यांच्या उपकारातून उतराई होणे तर शक्य नाही, परंतु किमान त्यांच्या मार्गावर काही अंतर चालणे शक्य आहे, असे विचार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
भदंत कश्यप महाथेरो यांच्यासह भिक्खू संघ डॉ. एच. बी. दहाट, डाॅ. के. डी. गायकवाड, डाॅ. शालिनी दहाट, डाॅ. एम. डी. गायकवाड. डॉ. एम. बी. काळबांडे, डाॅ. चंद्रकात थोरात, डाॅ. भास्कर खैरे, डाॅ. वीणा एम. गायकवाड, डॉ. शिवराज लाळीकर, डाॅ. प्रभा खैरे, डाॅ. सुरेश हरबडे, डाॅ. अरविंद गायकवाड, डाॅ. भारत सोनवणे, डाॅ. विशाल वाठोरे, डाॅ. चैतन्या पाटील, डाॅ. सागर वानखडे, डॉ. आर. जी. नरवडे, डॉ. बी. एन. गडवे, डॉ. मानव पगारे. डॉ. आनंद तारू, डॉ. संतोष गायकवाड, डॉ. प्रकाश साळवे, डॉ. सर्जेराव घोरपडे, डाॅ. आनंद भूक्तर, डॉ. मनोज भुक्तर, डाॅ. कल्पना गंगावणे, डाॅ. पल्लवी अभ्यंकर, डॉ. साहेबराव वाकडे हे या ओपीडीत सेवा देणार असून, त्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. शरद जाधव, के. बी. दिवेकर, दादाराव खंडागळे, सविता अभ्यंकर, सुनील पगडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.