दिनेश गुळवे , बीडदोन महिन्यापासून समाधानकारक पाऊस नसल्याने ग्रामीण भागात रोजगारही नाहीत. अशा परिस्थितीत रोजगाराअभावी उपासमार होऊ नये यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामरोजगार योजनेंतर्गत विविध ठिकाणी कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यात नरेगा अंतर्गत २३ हजार कुटुंबे विविध ठिकाणी कामावर आहेत.दुष्काळसदृष्य परिस्थिती, अतिवृष्टी किंवा दुष्काळ अशा परिस्थितीत ग्रामीण भागात रोजगार मिळत नाहीत. परिणामी हतावर पोट असणाऱ्या कुटुंबांची अशा परिस्थितीत उपासमार होते. यासाठी मजुरांनी कामाची मागणी केल्यानंतर त्यांना ‘नरेगा’ अंतर्गत कामे उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे शंभर दिवस रोजगार देण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. नरेगा अंतर्गत मजुरांना रस्ते, जोडरस्ते, पाझर तलाव, गाळ काढणे, विहिरी खोदणे, फळबागा, शेततळे, रोपवाटीका आदी ठिकाणी कामे उपलब्ध करून दिली जातात. सध्या आष्टी व बीड तालुक्यात सर्वाधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर, धारूर, माजलगाव, परळी या तालुक्यात मजुरांची संख्या कमी आहे.पाऊस नसल्याने अंतर्गत मशागतीची कामे उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी विविध कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या अंतर्गत सध्या २३ हजार कुटुंबांना कामे देण्यात आली आहे. विशेष म्हणजे १ एप्रील ते १६ आॅगस्ट दरम्यान सर्व मजुरांनी मिळून २५ लाख ४८ हजार ८९० दिवस कामे केली आहेत. यामध्ये ६ हजार ९५५ कुटुंबांनी शंभर दिवस काम केलेले आहे.
२३ हजार कुटुंब नरेगाच्या कामावर
By admin | Updated: August 17, 2014 00:11 IST