औरंगाबाद : ‘दी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट्स’तर्फे जून महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेमध्ये औरंगाबादचे १६ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यातील आठ विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. स्थानिक केंद्रातून खुशबू बंग या विद्यार्थिनीने ५८.२५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यंदा औरंगाबाद शाखेतून ३८१ विद्यार्थ्यांनी सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली. त्यापैकी ८ जण प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाले, तर ‘ग्रुप वन’मध्ये ४ आणि ‘ग्रुप टू’मध्ये ४ विद्यार्थी पास झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वप्रथम खुशबू बंग ही विद्यार्थिनी केंद्रातून प्रथम आली. गणेश तोतला, शुभी अग्रवाल, शिखा माछर, सुरभी खिंवसरा, पूजा चंडालिया, नूपुर लड्डा, भाग्यश्री जैन तसेच रश्मी काकानी, सुनील कबिराहाल्ली, स्वप्ना लुनावत, अनिरुद्ध जिंतूरकर, अपूर्वा गोगटे, आनंद चिरपूटकर, विनाली शिंदे, ओमप्रकाश मालू, रोझलिन अॅन्थोनी यांचा समावेश आहे. यासंदर्भात स्थानिक शाखेचे चेअरमन विजय राठी यांनी सांगितले की, प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण २ टक्के आहे. ‘ग्रुप वन’मध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ५.२५ टक्के, तर ‘ग्रुप टू’मध्ये उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण ४.२० टक्के एवढे आहे. मागील वर्षी ३१७ पैकी ९ विद्यार्थी सी.ए.ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मागील तीन वर्षांचा निकाल लक्षात घेता यंदा निकालाची टक्केवारी थोडी वाढली आहे. परिश्रमाचे फळ मिळालेऔरंगाबाद केंद्रातून सीएच्या अंतिम परीक्षेत प्रथम आलेल्या खुशबू बंग या विद्यार्थिनीने सांगितले की, दररोज ८ ते १० तास अभ्यास करीत असे, तसेच परीक्षेआधीचे दोन महिने तर दररोज १२ तास अभ्यास करीत होते. पहिला पेपर अवघड गेला होता. यामुळे थोडा हिरमोड झाला; पण परिश्रमाचे फळ मिळाले. माझे दोन्ही भाऊ आयआयटीत आहेत. घरात शैक्षणिक वातावरण असल्याने त्याचा अभ्यासाला मोठा फायदा झाला. या यशाचे श्रेय मी आई-वडील, आजोबा-आजी, नातेवाईक अन् शिक्षकांना देते.
औरंगाबादेतील १६ जण झाले ‘सीए’
By admin | Updated: August 9, 2014 00:56 IST