सुविधांचा अभाव, १५ काॅलेजला त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा संधी; अन्यथा ‘नो ॲडमिशन झोन’ची तंबी

By योगेश पायघन | Published: March 9, 2023 04:07 PM2023-03-09T16:07:07+5:302023-03-09T16:09:08+5:30

मान्यताप्राप्त प्राचार्य, आवश्यक अध्यापक, भौतिक सुविधा, अकॅडमिक ऑडिट आणि नॅक मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांनाच संलग्नीकरण देणार असल्याचे यापूर्वीच कुलगुरूंनी स्पष्ट केले.

15 colleges without physical facilities last chance to make amends; Otherwise 'No Admission Zone' action | सुविधांचा अभाव, १५ काॅलेजला त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा संधी; अन्यथा ‘नो ॲडमिशन झोन’ची तंबी

सुविधांचा अभाव, १५ काॅलेजला त्रुटीपूर्ततेसाठी पुन्हा संधी; अन्यथा ‘नो ॲडमिशन झोन’ची तंबी

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची भौतिक पडताळणी झालेल्या १५ महाविद्यालयांची सुनावणी कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी बुधवारी घेतली. यात मान्यताप्राप्त प्राचार्य, आवश्यक प्राध्यापक, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळेसह विविध त्रुटींची पूर्तता १० एप्रिलपर्यंत करा, अन्यथा संलग्नीकरण न देता ‘नो ॲडमिशन झोन’मध्ये टाकण्याची तंबी देण्यात आली आहे.

कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी विशेष अधिकारात पहिल्या टप्प्यांत २३ महाविद्यालयांची तपासणी केल्यावर त्या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करून प्रवेशबंदीची कारवाई केली होती. दुसऱ्या टप्प्यात ५९ महाविद्यालयांच्या भौतिक सुविधांची मोहीम हाती घेतली. त्यापैकी २५ महाविद्यालयांतील भाैतिक सुविधांच्या पडताळणीचे अहवाल प्राप्त झाल्यावर १० महाविद्यालयांच्या सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी घेतली होती. १६ निकषांवर झालेल्या पडताळणीत ज्या त्रुटी आढळल्या त्या महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून दिल्या.

....तरच महाविद्यालयांचे संलग्नीकरण
मान्यताप्राप्त प्राचार्य, आवश्यक अध्यापक, भौतिक सुविधा, अकॅडमिक ऑडिट आणि नॅक मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांनाच संलग्नीकरण देणार असल्याचे यापूर्वीच कुलगुरूंनी स्पष्ट केले. त्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत संलग्नीकरणापूर्वीच सर्व त्रुटी महाविद्यालयांना दूर करून संलग्नीकरणाला सामोरे जावे लागेल.

या महाविद्यालयांची झाली सुनावणी
स्वामी विवेकानंद काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्स खुलताबाद, भारत काॅलेज ऑफ मास कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम जालना, ओमशांती काॅलेज ऑफ एज्युकेशन जालना, जिजाऊ आर्ट ॲण्ड सायन्स काॅलेज वरूड (जाफ्राबाद), तुलसी काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्स बीड, गुरुकुल काॅलेज ऑफ काॅम्प्युटर सायन्स बीड, आर्ट, सायन्स ॲण्ड काॅमर्स काॅलेज बीड, राजीव गांधी आर्ट, सायन्स काॅलेज बीड, कला महाविद्यालय आडस, आर्ट, काॅमर्स ॲण्ड सायन्स काॅलेज बीड, बिल गेट्स इन्स्टिट्यूट धाराशिव, महानंदा बीएड काॅलेज, धाराशिव, काॅलेज ऑफ फिजिक्स धाराशिव, श्रमजीवी काॅलेज ऑफ एज्युकेशन धाराशिव इ. महाविद्यालयांची सुनावणी बुधवारी झाली.

मुदत वाढ देण्यात आली आहे
बुधवारी १५ महाविद्यालयांची सुनावणी झाली. या सुनावणीत १६ मुद्द्यांवरील त्रुटी महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देत महाविद्यालयांचे म्हणणे कुलगुरूंनी जाणून घेतले. त्रुटीपूर्तता करण्यासाठी महाविद्यालयांना मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ३४ पैकी महाविद्यालयांची तपासणी सुरू आहे. काही महाविद्यालयांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांचीही लवकरच सुनावणी होईल.
- डाॅ. श्याम शिरसाठ, प्रकुलगुरू, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Web Title: 15 colleges without physical facilities last chance to make amends; Otherwise 'No Admission Zone' action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.