चंद्रपूर : चंद्रपूर येथील मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषद प्रशासन अखेर जागे झाले. शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांची जयंती दरवर्षी १० जानेवारीला जिल्हा परिषदेद्वारे साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सभेत घेण्यात आला. पुतळ्याच्या दुरवस्थेवर स्थायी समितीच्या सभेत झालेल्या वादळी चर्चेनंतर हा ठराव मंजूर करण्यात आला. तर पुतळ्यांच्या दुरूस्तीसाठी दरवर्षी ३ लक्ष रुपयाचा निधीचीही तरतुद अर्थसंकल्पात करण्याचे ठरविण्यात आले. स्थायी समितीमध्ये सभेच्या सुरुवातीलाच काँग्रेस पक्षाचे जि.प.चे गटनेते सतिश वारजूकर व उपनेते विनोद अहीरकर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री, विदर्भाचा गौरव व चंद्रपूरचा मानबिंदू असलेले लोकनेते स्व. मा.सा. कन्नमवार यांचा जयंतीचा विसर जिल्हा परिषदेला पडला आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला. १० जानेवारीला मा. सा. कन्नमवार यांची जयंती असताना त्यांची जयंती समारंभपूर्वक पार पाडण्याची गरज जिल्हा परिषदेला वाटत नाही काय, राज्याला विदर्भाने मुख्यमंत्री दिला ते चंद्रपूर जिल्ह्याचे असल्याने त्यांची जयंती खरे तर चंद्रपूर जिल्ह्यात उत्सव म्हणून साजरा करायला पाहिजे. विदर्भातील एक झुंजार नेता स्वबळावर मुख्यमंत्री होऊन चंद्रपूर जिल्ह्याची राजकीय ओळख संबंध महाराष्ट्रास दिली. हे त्यांचे महान कर्त्वृत्व असताना चंद्रपूर जिल्ह्यालाच त्याचा विसर पडावा, ही अतिशय वेदना देणारी बाब असल्याचे विरोधी सदस्यांनी म्हटले. त्यामुळे त्यांची जयंती दरवर्षी १० जानेवारीला जिल्हा परिषदेतर्फे साजरी करावी, अशी मागणी विनोद अहीरकर यांनी लावून धरली. या मागणीस सतीश वारजूकर यांनी अनुमोदन दिले.त्यामुळे मा.सा. कन्नमवार हे जिल्ह्याचे आदरनीय नेते असल्याने त्यांची जयंती पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी उत्साहाने पार पाडावी, असे मत भाजपाचे गटनेते सभापती देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले. यावर सभागृहात चर्चा होऊन या वित्तीय वर्षापासून दरवर्षी १० जानेवारीला मा.सा. कन्नमवार यांची जयंती जिल्हा परिषदेच्या वतीने साजरी केली जाईल व मुख्य कार्यक्रम वसंत भवन येथील मा.सा. कन्नमवार यांचा पुतळा असलेल्या ठिकाणी करण्यात येईल, असे जिल्हा परिषद अध्यक्षांनी सभागृहात सांगितले. तसेच पुतळ्याची देखभाल व कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पात दरवर्षी किमान ३ लाखाची तरतुद करावी अशी मागणी विनोद अहिरकर यांनी केली. त्यांचा या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी मागणी मान्य केली. (स्थानिक प्रतिनिधी)
कन्नमवारांच्या जयंतीसाठी अखेर जि.प.चा पुढाकार
By admin | Updated: January 23, 2016 01:08 IST