झेडपी अध्यक्षपदी देवराव भोंगळे तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहारे
By Admin | Updated: March 22, 2017 00:45 IST2017-03-22T00:45:46+5:302017-03-22T00:45:46+5:30
येथील जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचे देवराव भोंगळे यांची तर उपाध्यक्षपदी भाजपाचेच कृष्णा सहारे यांची निवड झाली.

झेडपी अध्यक्षपदी देवराव भोंगळे तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहारे
भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांत निवडणूक : तीन अपक्ष सदस्यांचे भाजपच्या बाजूने मतदान
चंद्रपूर : येथील जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाचे देवराव भोंगळे यांची तर उपाध्यक्षपदी भाजपाचेच कृष्णा सहारे यांची निवड झाली. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दोन्ही पदांसाठी उमेदवार उभे केले. मात्र दोन्ही पदांवर ३६ विरूद्ध २० अशी मते घेत भाजपाचे देवराव भोंगळे व कृष्णा सहारे हे विजयी झालेत.
जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झालेले देवराव भोंगळे हे पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा-घोसरी या जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून आले असून त्यांनी काँग्रेसचे दिग्गज विनोद अहीरकर यांचा पराभव केला होता. त्यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय मानले जाते. भोंगळे यांनी यापूर्वी घुग्घुस जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून येत जिल्हा परिषद बांधकाम व शिक्षण सभापती पद भुषविले आहे. भाजप पक्षाने ३३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत सिद्ध होताच त्यांची पक्षाचे गटनेते म्हणून यापुर्वीच निवड झाली होती. त्यामुळे अध्यक्षपदी त्यांचीच वर्णी लागणार, हे निश्चित होते. मंगळवारच्या सभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
तर उपाध्यक्षपदी निवड झालेले कृष्णा सहारे हे ब्रह्मपुरी तालुक्यातील अऱ्हेरनवरगाव-नान्हेरी जि. प. क्षेत्रातून निवडून आले आहेत. कृष्णा सहारे यांची जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असून या पहिल्या संधीतच त्यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. कृष्णा सहारे यांनी सन १९९९-२००० ला ब्रह्मपुरी पंचायत समितीचे उपसभापती पद भुषविले आहे. निवडणुकीनंतर नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांची वाहनावर बँडच्या गजरात जिल्हा परिषदेतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांनी अद्याप पदभार स्वीकारला नसून ३ एप्रिलला पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारले जाणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दिग्गजांना आता सभापतिपदाची आस
भाजपा गटनेतेपदी देवराव भोंगळे यांची यापुर्वीच पक्षाच्या पुढाऱ्यांनी निवड केली होती. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागेल हे आधीच निश्चीत होते. मात्र उपाध्यक्षपदासाठी नागराज गेडाम, संजय गजपुरे, ब्रिजभुषण पाझारे, अर्चन जिवतोड या दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र ऐनवेळी वेळी कृष्णा सहारे यांचे नामांकन भरण्यात आले. त्यामुळे चर्चेतील दिग्गजांची नावे आपोआपच मागे सरली. त्यातील काहींना सभापतीपदांची शक्यता आहे.
काँग्रेसच्या
उमेदवाराला २० मते
अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून गोदरू पाटील जुमनाके यांचे तर उपाध्यक्षपदासाठी रमाकांत लोधे यांचे नामांकण दाखल करण्यात आले. मात्र गोदरू पाटील जुमनाके यांचा देवराव भोंगळे यांनी तर रमाकांत लोधे यांचा कृष्णा सहारे यांनी २० विरूद्ध ३६ असा पराभव केला. ३ अपक्ष सदस्य हे भाजपाकडून राहिले.
ग्रामीण विकासाला चालना देणार
जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा कणा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्रामीण विकास व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात आपण काम करणार असून त्यांच्याकडून अधिकाअधिक निधी मंजूर करून विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहील.
- देवराव भोंगळे, नवनियुक्त जि. प. अध्यक्ष, चंद्रपूर.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करणार
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मागासलेपणा दूर झाल्याशिवाय विकास शक्य नाही. शेतकरी हिताच्या योजना राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. वीज, रस्ते, पाणी आदी समस्या गंभीर असून या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल. मतदारांनी व पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थक ठरवीन.
- कृष्णा सहारे, नवनियुक्त जि. प. उपाध्यक्ष, चंद्रपूर.