जि.प. व पं.स. निवडणुकीवर बाजार समितीचा ‘तडका’

By Admin | Updated: January 3, 2017 00:41 IST2017-01-03T00:41:57+5:302017-01-03T00:41:57+5:30

जि.प. आणि पं.स.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना ...

Zip And p. Market Committee's 'Tadka' | जि.प. व पं.स. निवडणुकीवर बाजार समितीचा ‘तडका’

जि.प. व पं.स. निवडणुकीवर बाजार समितीचा ‘तडका’

नागभीड बाजार समिती : ५ मार्च रोजी निवडणूक
घनश्याम नवघडे नागभीड
जि.प. आणि पं.स.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना नागभीड कृषी उत्पन्ना बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून सहकार विभागाने जि.प. व पं.स. निवडणुकीवर चांगलाच ‘तडका’ मारला आहे. या निवडणुकीने तालुक्यातील राजकीय वातावरण आणखीणच तापले आहे.
संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड कृषी उत्पन्ना बाजार समितीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच या बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून येण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. यापूर्वी या बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक जुलै २००८ मध्ये पार पडली होती. तब्बल साडेआठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही निवडणूक होत असल्याने अनेकांच्या मनात या निवडणुकांची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जुलै २००८ मध्ये जेव्हा या बाजार समितीची निवडणूक पार पडली तेव्हा राज्यात काँग्रेसचे सरकार आणि तेथील आमदारही काँग्रसचेच होते. पण या तालुक्यातील बहुतांश भूभाग ब्रम्हपुरीचे भाजप आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होता. त्यामुळे या निवडणुकीचे नेतृत्व अर्थातच काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी तर भाजपाकडून प्रा. अतुल देशकर यांनी केले होते. या वेळी या बाजार समितीवर काँग्रेसने आपला ‘झेंडा’ रोवला होता.
दरम्यानच्या काळात या बाजार समितीत अनेक घडामोडी घडल्या, अविश्वासाचे अनेक नाटक पाहायला मिळाले. कोर्ट कचेऱ्यांची दिवसेही आली. प्रशासकांच्या नियुक्तीचे आदेशही अनेकदा काढण्यात आली पण, आता राज्यात सरकारही भाजपचेच आमदारही भाजपचे आहेत. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होऊ घातली आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक ५ मार्च २०१७ रोजी होत आहे. एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होत असून यात सहकारी संस्था मतदार संघातून ११ ग्रामपंचायत मतदार संघातून चार, व्यापारी, अडते व प्रक्रिया मतदार संघातून दोन तर हमाल मापारी मतदार संघातून एक संचालक निवडून द्यायचा आहे. या विभागाने मतदार यादीही प्रसिद्ध केल्याने या निवडणुकीच्या चर्चानी वेग घेतला आहे.
ऐन जि.प. आणि पं.स. निवडणुकीच्या काळात ही निवडणूक जाहीर करण्यात आल्याने या निवडणुकीचे नेतृत्वाला सोयीचे होणार आहे. जि.प. आणि पं.स.ची तिकीट मागणाऱ्यांची भरमार आहे. ज्यांना या निवडणुकीचे तिकीट देवू शकणार नाही त्याची बोळवण बाजार समितीची उमेदवारी देवून करण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र येणाऱ्या काळात चित्र स्पष्ठ होणार आहे.

काँग्रेस विरुद्ध भाजप
सद्यस्थितीत या निवडणुकीचा राजरंग पाहू जाता काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे नेतृत्व चिमूरचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर हे करतील तर भाजपाचे नेतृत्व चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया करतील. दोन्ही पक्षातून संधी न मिळालेले तिसरी आघाडी निर्माण करतील काय? अशी चर्चासुद्धा या निमित्ताने ऐकायला मिळत आहे.

नागभीड बाजार समितीत २०१४ ते २०१६ या कालावधीत तीनदा प्रशसकाची नियुक्ती करण्यात आली. एम.ई. भगत यांनी १९ आॅगस्ट २०१४ ते ३० आॅगस्ट २०१४, प्रफुल्ल खापर्डे यांच्या नेतृत्वात ३० आॅगस्ट ते १३ सप्टेंबर २०१४ हे शासन नियुक्त प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. हे मंडळ बरखास्त करण्यात आल्यानंतर पूर्वीचे सभापती अ.ह. पठाण यांचे कार्यकारी मंडळ नियुक्त करण्यात आले व ४ मार्च २०१६ रोजी पठाण यांचे कार्यकारी मंडळ बरखास्त करून एम.बी.उईके यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Web Title: Zip And p. Market Committee's 'Tadka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.