प्रभारीच्या खांद्यावर जिल्हा परिषदेचा डोलारा

By Admin | Updated: May 14, 2016 00:37 IST2016-05-14T00:37:26+5:302016-05-14T00:37:26+5:30

येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची २९ एप्रिल रोजी ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.

Zilla Parishad's hand over shoulder in charge | प्रभारीच्या खांद्यावर जिल्हा परिषदेचा डोलारा

प्रभारीच्या खांद्यावर जिल्हा परिषदेचा डोलारा

नवीन सीईओची प्रतीक्षा : तीन पदांचा भार एकाच अधिकाऱ्यावर
चंद्रपूर : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची २९ एप्रिल रोजी ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. तेव्हापासून चंद्रपूर जिल्हा परिषदेचा कारभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे. यामुळे विविध कामांमध्येही अडथळे येत असून नवीन सीईओची प्रतीक्षा लागली आहे.
बदली झालेले महेंद्र कल्याणकर हे गतवर्षीच जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाले होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या अनेक बैठका रात्री उशीरापर्यंत चालायच्या. याबाबत विरोधक व सत्ताधाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. कर्मचाऱ्यांत त्यांचा चांगला दरारा होता. मात्र जेमतेम एक वर्षातच त्यांना पदोन्नती देत ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. बदलीनंतर दोन-तीन दिवसांत ते चंद्रपुरातून भारमुक्त झाले. त्यांची बदली होऊन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही.
सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांच्याकडे आहे. या व्यतीरिक्त अशोक सिरसे यांच्याकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचाही भार आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याला तीन पदांचा भार सोसावा लागत असून अनेक कामांवर परिणाम होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या विरोधी सदस्यांचे म्हणणे आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेत सध्या भाजप पक्षाची सत्ता आहे आणि राज्यातही भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे वित्त व वन मंत्री आहेत. तरीही नवीन सीईओंच्या नियुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे. तर आपल्या मर्जीतील मुख्य कार्यकारी अधिकारी असावा, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची फिल्डींग आहे. त्यामुळे नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला विलंब केला जात असल्याचा आरोप विरोधी सदस्यांचा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad's hand over shoulder in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.