जिल्हा परिषदेत विषय मंजुरीचा गुंता
By Admin | Updated: December 27, 2016 01:31 IST2016-12-27T01:31:27+5:302016-12-27T01:31:27+5:30
शुक्रवारी पार पडलेल्या येथील जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत सदस्यांच्या गोंधळामुळे सभा अर्धवट

जिल्हा परिषदेत विषय मंजुरीचा गुंता
गोंधळात पार पडलेल्या सभेतील सर्वच विषय मंजूर !
सत्ताधारी व विरोधकांचाही बोलण्यास नकार
चंद्रपूर : शुक्रवारी पार पडलेल्या येथील जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत सदस्यांच्या गोंधळामुळे सभा अर्धवट गुंडाळावी लागली. विषयपटलावर असलेल्या १३ विषयांपैकी मोजक्याच विषयांवर चर्चा झाली होती. त्यामुळे एक-दोन विषयच मंजूर झाले होते. मात्र सत्ताधारी गटाकडून सर्वच विषय मंजूर झाल्याचे सांगण्यात येत असून विरोधकही यावर भाष्य करायला तयार नाही. त्यामुळे विषय मंजूरीचा गुंता वाढला आहे.
काही दिवसांतच जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक विभागाचा निधी अखर्चित आहे. आचारसंहिता लागण्यापुर्वी विकास कामांना मंजुरी देण्यासाठी व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी २३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. ही सभा वादळी ठरणार याची आधीच शक्यता होती. सभेला सुरूवात झाली तेव्हा विषयपटलावरील एक विषय वाढविल्याच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, विषय क्रमांक दोन ते तीनवर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी व विरोधी जिल्हा परिषद सदस्यांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सभेतून बहिर्गमन केले. परिणामी सभा काही वेळातच गुंडाळावी लागली. त्या गोंधळात विषयपटलावरील सर्व विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. त्यात जिल्हा परिषद शाळांना पुरविण्यात येणाऱ्या ई-लर्निंग निविदा स्वीकृतीचा महत्त्वपूर्ण विषय होता. सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा झाली. या सभेला अनेक सदस्य गैरहजर होते. सभा संपल्यानंतर शुक्रवारच्या विशेष सभेतील सर्वच विषय मंजूर झाल्याची माहिती सत्ताधाऱ्यांकडून मिळाली. मात्र या विषयावर अधिकची माहिती देण्यास कुणीही तयार नव्हते. जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होऊ घातली आहे. काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण विषयांना केव्हा मंजुरी मिळेल हा प्रश्न असताना आधीच मंजुरी मिळाल्याच्या चर्चेने सारेच हैराण आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
अधिकारी पालकमंत्र्यांना भेटले
४शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेतील गोंधळ पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचले आहे. विशेष सभेत सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी ‘सीईओ मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सभेतून बहिर्गमन केले होते. दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीआधीच जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना निवेदन देऊन झालेला प्रकार त्यांच्या कानावर टाकला. त्यांनीही हा प्रकार गांभीर्याने घेतल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवारच्या विशेष सभेत पाच ते सहा विषय मंजूर झाले. त्यानंतर सभेत गोंधळ निर्माण झाल्याने सभा गुंडाळण्यात आली. सर्व विषय मंजुरीबाबत अजूनही कोणतीच माहिती मिळाली नाही.
- डॉ. सतीश वाजूरकर
काँग्रेस गटनेते, जिल्हा परिषद चंद्रपूर.