गोवरीतील युवकांनी केली मशरूम शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:00 IST2018-03-03T23:00:25+5:302018-03-03T23:00:25+5:30
जीवन जगण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावरच यश मिळते. हे गोवरीतील धडपड्या दोन युवकांनी मशरूम (अळींबी) शेतीतून सिद्ध केले आहे.

गोवरीतील युवकांनी केली मशरूम शेती
प्रकाश काळे ।
आॅनलाईन लोकमत
गोवरी : जीवन जगण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावरच यश मिळते. हे गोवरीतील धडपड्या दोन युवकांनी मशरूम (अळींबी) शेतीतून सिद्ध केले आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी येथील तुषार झाडे (२२) आणि वैभव दरेकर (२१) असे या धडपड्या युवकांचे नाव आहे. दोघांच्याही घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षण घेत असताना प्रचंड अडचणी यायच्या. शिक्षणासाठी वेळोवेळी पैसा मिळायचा नाही. कसेबसे दोघांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. अशातच मशरूम शेती करण्याचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती या युवकांना मिळाली. क्षणाचांही विलंब न लावता दोघांनीही जळगाव येथे मशरूम प्लांटचे प्रशिक्षण घेण्याचा विचार मनात पक्का केला. मशरूम तज्ज्ञांकडून सर्व माहिती जाणून घेतली. आधुनिक शेतीचे धडे घेतले. मशरूम लागवड करण्यासाठी उन्ह लागू नये, म्हणून मोठ्या शेडची आवश्यकता होती. मात्र, पैशाअभावी युवकांनी राहत्या घरातच मशरूम शेतीसाठी जागा निवडली. मशरूम लागवड करण्यासाठी एका प्लॉस्टिकमध्ये कुटार घेवून एकमेकांवर थर तयार केले. मशरुम २५ ते ४५ दिवसांचे उत्पादन असून तीनदा तोडणी करता येते. ग्रामीण भागात मशरूमची विशेष मागणी नाही. पण, शहरी भागातील हॉटेल, रेस्टॉरेंटमध्ये मशरुमला मोठी मागणी आहे. व्यावसायिक हेतू ठेवून दोघांनीही योग्य नियोजन केले. मशरूमचा दर सध्या प्रती किलो २५० रुपये आहे. कमी खर्चात चांगले पीक घेता येते. केवळ पारंपरिक शेती न करताना परसबाग अथवा घरातील एका खोलीच मशरूम शेती सहजपणे करता येते. शासनाने विक्रीची व्यवस्था करावी, अशी मागणी तुषार झाडे व वैभव दरेकर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी केली.
मशरूम गुणकारी
मशरूम (अळींबी) मध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आहेत. मशरूमचा आहारात वापर केल्यास शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गॅस, अॅसिडीटी दूर करते. मशरूम सेवण केल्याने मधूमेह, रक्तदाब व हृदयविकार नियंत्रणात ठेवता येतो.