ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी युवकांचा एल्गार

By Admin | Updated: August 21, 2016 02:54 IST2016-08-21T02:54:18+5:302016-08-21T02:54:18+5:30

जिल्ह्याच्या मागणीसाठी अवघे ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही दिवस सर्वच शांत बसले.

Youth's Elgar for Brahmapuri District | ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी युवकांचा एल्गार

ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी युवकांचा एल्गार

९ सप्टेंबरला धरणे : सोशल मीडियावरही रंगतेयं चर्चा
ब्रह्मपुरी : जिल्ह्याच्या मागणीसाठी अवघे ब्रह्मपुरीकर रस्त्यावर उतरले होते. दरम्यान काही दिवस सर्वच शांत बसले. पण युवकांच्या मनात मात्र अजूनही ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी कायम आहे. सोशल मिमियाच्या ३०० ते ३५० युवकांचा समावेश असलेल्या ग्रुपवर जिल्ह्यासाठी अनेक मत नोंदवित युवकांनी ‘ जिंकू किंवा मरु’ असा संकल्पही केल्याने येत्या काही काळात ब्रह्मपुरी जिल्हा मागणीचा लढा तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अनुषंगाने ९ सप्टेंबरला शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचीही घोषणा सर्वपक्षीय, युवक, महिला वर्गाकडून करण्यात आली आहे.
ब्रह्मपुरी हे शहर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. येथील राजकारणात अनेकवेळा वादविवादही झाले. आता कोण मोठा व कोण लहान याचा विचार मागे पडून जिल्हा निर्मितीच्या लढ्याची धुरा या तरुणवर्गानी आपल्या अंगावर घेतली आहे. अहिंसा मार्ग पत्करुनच ते लढा देणार आहेत. सोशल मिडियावर शहरातील ३०० ते ३५० युवकांनी एकत्र येऊन एक ग्रुप स्थापन केला व त्यामध्ये पुढे जिल्ह्याच्या लढ्याचे विचार मंथन तासनतास किंवा रात्रंदिवस सुरू झाले. त्यामध्ये युवकांनी आपली केवळ मते मांडली नाही तर संघर्षाची तयारीही दर्शविली असल्याने जिल्हानिर्मितीच्या आंदोलनाला आणखी तिव्रता येणार आहे. ब्रह्मपुरीत आजूबाजूचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन अन्य ठिकाणी कार्यरत आहेत. त्या युवकांनीही ब्रह्मपुरी जिल्हा व्हावा, यासाठीचे आपले समर्थन सोशल मिडियावर दर्शविले आहे.
हे केवळ ब्रह्मपुरीच्या वैभवशाली संपत्तीचे फलित आहे. एरवी ब्रह्मपुरीचा युवक अभ्यासाच्या पलिकडे अन्य बाबीकडे लक्ष देत नाही. पण ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी आता येथील तरुण अक्षरश: पेटून उठलेला दिसून येत आहे. जिल्ह्याच्या मागणीसाठी आम्ही वेळप्रसंगी ‘सैराट’ होऊ अशीही शपथ या ग्रुपवर युवकांनी घेतल्याने त्यांच्या अंतर्मनाची कळकळ दिसू लागली आहे. सोशल मिडिया हे केवळ निमित्त आहे. त्यातून लक्षात घेण्यासारखे म्हणजे जिल्हानिर्मितीविषयीची त्यांची कळकळ. त्यांच्या सोशल मिडियाच्या चर्चेतून आंदोलनाचे स्वरुपही ठरत आहे. त्यातूनच ९ सप्टेंबरला शिवाजी चौकात युवकांच्या साक्षीने धरणे आंदोलन होणार आहे. परंतु या सर्व घडामोडीत ‘युवक व विवेक’ याचा ताळमेळ नक्कीच राहणार आहे. उठसूट कोणीही पात्रता नसताना जिल्ह्यासाठी आपलाच क्षेत्र पात्र असल्याचा आव आणून ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करेत असेल तर ते ब्रह्मपुरीकर खपवून घेणार नाही. तो येथील पोषक मूल्यांचा अपमान ठरेल, असेही मत युवक वर्गाकडून मांडले जात आहे. आता ही मते कृतीत परावर्तीत होत असल्याने ‘जिंकू किंवा मरु’ चा संकल्प आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Youth's Elgar for Brahmapuri District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.