तरुणाईने जिंकले रणांगन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST2021-01-22T04:25:37+5:302021-01-22T04:25:37+5:30
मासळ (बु) : चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींचा निकाल लागला. यात अनेक गावांत युवावर्गाने प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देत गावातील ...

तरुणाईने जिंकले रणांगन
मासळ (बु) : चिमूर तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींचा निकाल लागला. यात अनेक गावांत युवावर्गाने प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देत गावातील कारभारांची सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली. मात्र आता सरपंच पदाचे आरक्षण कसे येईल, या चिंतेत ते सापडले आहेत.
निवडणुकीत विजय तर संपादन केला. मात्र सरपंच पदाचे आरक्षण कोणते, हे चित्र मात्र अजूनही अस्पष्ट असल्याने सरपंच पदाच्या गप्पा आता चौकाचौकांत रंगू लागल्या आहेत. या गप्पांमध्ये आमच्या पक्षाची किती ग्रामपंचायतींत दावेदारी आहे, हे सांगण्याची घाई अनेक गावपुढाऱ्यांना दिसून येत आहे.
सोमवारी निकाल लागल्यानंतर दिवसभर गावागावांत जल्लोष होता. सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गाचे निघणार, सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यावर आता तर्कवितर्क लढविले जात आहेत.
अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांना थेट निधी येत असल्याने सरपंच पद मानाचे व मिळकतीचे बनत आहे. त्यामुळे सरपंच पदाची खुर्ची अनेक नवनियुक्त युवा तरुणांना भुरळ पाडत आहे. मतदारांनी निवडून दिलेल्या उमेदवारांना आरक्षण सोडतीपासून अजून लांबच ठेवले आहे. जेवढी उत्सुकता निवडून येण्याची होती, त्यापेक्षा जास्त आता आरक्षण सोडतीची आहे. ज्या उमेदवाराला गावातील पॅनेलने निवडणुकीत बळजबरीने उभे केले त्यालासुद्धा आता सरपंच पदाचे स्वप्न पडू लागले आहे.
बॉक्स
नेत्यांचे दावे-प्रतिदावे
सोमवारी निवडणुकीचा निकाल घोषित झाल्याबरोबर वरिष्ठ नेते गावागावांत जाऊन निवडणुकीत विजय संपादित केलेला नवनियुक्त सदस्य हा आमच्या पक्षाचा, असे सांगत आहेत. तर दुसरा नेता तोच उमेदवार आमचा असल्याचे सांगत आहेत.