तेलंगणात कामासाठी गेलेल्या युवकांची अखेर सुटका
By Admin | Updated: April 23, 2016 01:03 IST2016-04-23T01:03:05+5:302016-04-23T01:03:05+5:30
तालुक्यातील आठ युवक मागील २-३ महिन्यांपासून तेलंगणा येथील एका कंपनीत काम करण्यासाठी गेले.

तेलंगणात कामासाठी गेलेल्या युवकांची अखेर सुटका
सावली : तालुक्यातील आठ युवक मागील २-३ महिन्यांपासून तेलंगणा येथील एका कंपनीत काम करण्यासाठी गेले. मात्र कंपनी प्रशासन त्यांना कामाचा मोबदला न देता त्यांना गावाकडे परत येऊ देत नव्हते. दरम्यान, श्रमिक एल्गारच्या तक्रारीनंतर अपर पोलीस अधीक्षक राजपूत यांनी तेलंगाणा पोलिसांचय मदतीने या कामगारांची शुक्रवारी सुटका केली.
सावली तालुक्यातील चारगाव येथील चंद्रशेखर गजानन गावतुरे, समिर श्यामकुमार मडावी, जयपाल अरूण गेडाम, नागेश कपील कुमरे, राकेश शांताराम गुरनुले, मोसम पत्रू आत्राम, शरद वेटे, रामा भैयाजी मोहुर्ले हे युवक काम करण्यासाठी सूर्यभान रामटेके यांच्यासोबत ७ फेब्रुवारीला तेलंगानातील येमुलवाडा येथे गेले. रामटेके यांनी तिथे पोहचल्यावर शंकर नामक ठेकेदाराकडे या मजुर युवकांना कामासाठी सोपविले. शंकर ठेकेदाराने येमुलवाडा येथील श्रीराम कोरी या दगडाच्या खाणीत या युवकांना काम दिले. त्यांचेकडून नियमीत काम करवून घेतले. मात्र मजुरांना गावाकडे परत येण्यासाठी मनाई केल्या जात आहे. मजुरांचा छळ केल्या जात आहे व मजुरीही दिल्या जात नसल्याची तक्रार पालकांनी श्रमिक एल्गारकडे केली. मजुरांची अडचण लक्षात घेता ठेकेदाराचे तावडीतून सुटका करण्याची मागणी निवेदनाद्वारे श्रमिक एल्गारचे महासचिव विजय कोरेवार यांच्या नेतृत्वात पालकांनी अपर पोलीस अधीक्षक राजपूत यांच्याकडे केली. त्याची दखल घेत राजपूत यांनी तेलंगणा सूत्रे हलवित कामगारांची सुटका केली. (शहर प्रतिनिधी)