प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: September 30, 2014 23:34 IST2014-09-30T23:34:47+5:302014-09-30T23:34:47+5:30
आपली साथ सोडून प्रेयसीने दुसऱ्यासोबत सूत जुळविल्याने तसेच तिचा नवा प्रियकर त्रास देत असल्याच्या कारणाने वरोरा शहरातील एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या
वरोरा : आपली साथ सोडून प्रेयसीने दुसऱ्यासोबत सूत जुळविल्याने तसेच तिचा नवा प्रियकर त्रास देत असल्याच्या कारणाने वरोरा शहरातील एका युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी त्याच्याजवळ आढळलेल्या चिठ्ठीच्या आधारे प्रेयसी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन आंबोलकर (२८) असे मृत युवकाचे नाव आहे.
कर्मवीर वॉर्डातील सचिन सुरेश आंबोलकर याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. प्रेम बहरत असताना सचिनच्या प्रेयसीने दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध सुरु केले. त्यामुळे सचिनला तिने नाकारले. सचिन तिला भेटण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्याला दोघांनीही त्रास देणे सुरू केले. प्रेयसी व तिच्या प्रियकराचा त्रास असह्य झाल्याने सचिनने वणी- वरोरा रस्त्यावरील सुंदरवन वसाहतीजवळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. वरोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)